विद्यार्थिनींची प्रकृती खालावली : आठ जणांना म्हापसा येथील जिल्हा सामाजिक रूग्णालयात हलविले : डिचोलीतील शांतादुर्गा उ.मा.विद्यालयातील घटना
डिचोली / प्रतिनिधी
डिचोलीतील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला शाखेच्या वर्गात सर्व विद्यार्थिनी असताना काही विद्यार्थ्यांनीच खिडकीतून ‘पेपर स्प्रे’ (मिरपूड स्प्रे) मारल्याने सर्व विद्यार्थिनी गुदमरल्या. त्यातील 11 विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याने त्यांना त्याच परिस्थितीत डिचोलीतील सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सदर विद्यार्थिनी अक्षरश: तळमळत होत्या. डिचोली सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थिनींच्या प्रकृतीत स्थिरता आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. 11 पैकी 8 जणांना दुपारी म्हापसा येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, या असंवेदनशील प्रकारामुळे डिचोली शहरात एकच खळबळ माजली व तीव्र असंतोषही व्यक्त करण्यात आला. या प्रकारामध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई व्हावी, त्यांना विद्यालयातून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी केली आहे. याप्रकरणी पोलीस व व्यवस्थापनाकडून कसून तपास सुरू आहे.
दुपारी इस्पितळात एकच धावपळ आणि गोंधळ
सदर घटना दुपारी 12 वा. च्या सुमारास घडली. विद्यार्थिनींना श्वसनाचा त्रास जाणवून त्या अस्वस्थ होऊ लागल्याने विद्यालयातील शिक्षक-शिक्षिकांनी विलंब न करता तसेच रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता या विद्यार्थिनींना आपल्याच वाहनांमधून थेट डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे कॅज्युअल्टीमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना पहिल्या मजल्यावर दाखल करण्यात आले. यावेळी इस्पितळात एकच गोंधळ उडाला. इस्पितळातील डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. या विद्यार्थ्यांचे पालक व परिसरातील नागरिकही इस्पितळात दाखल झाले.
विद्यार्थिनी अक्षरश: तळमळत होत्या, अन् पालकांना रडू आवरत नव्हते..
या पेपर स्प्रेचा फवारा जवळून बसलेल्या विद्यार्थिनींना अधिक त्रास झाला. त्यांच्या थेट नाका-तोंडात सदर स्प्रे गेल्याने त्यांना श्वास घेता येत नव्हता व घशाला
प्रचंड ठसका बसला होता. त्यामुळे गुदमरलेल्या अवस्थेत इस्पितळातील खाटांवर झोपलेल्या विद्यार्थिनी अक्षरश: तडफडत होत्या. डॉक्टर व कर्मचारी या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते. काही विद्यार्थिनी तर बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना ऑक्सिजन लावून स्थिर करण्याचे प्रयत्न सुरूच होते. हे दृष्य एकदम भयानकच होते. आपापल्या मुलींना सांभाळताना पालकांची मात्र बरीच घालमेल झाली. त्यांना शुद्धीवर ठेवण्यासाठी त्यांचे हातपाय घासताना पालकांना आपल्या मुलींची बिकट परिस्थिती पाहून रडू आवरत नव्हते. सर्व वातावरणच भयानक बनले होते.
आठ जणांना म्हापसा येथे हलविले, दोघे डिचोली इस्पितळात तर एकीला घरी सोडले
अस्वस्थ वाटू लागलेल्या 11 पैकी 8 विद्यार्थिनींना त्यांची प्रकृती स्थिर होत नसल्याने म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 2 विद्यार्थिनींना डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रातच ठेवण्यात आले होते. तर एका विद्यार्थिनीला बरे वाटू लागल्याने घरी जाऊ दिले होते. म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थिनींची आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी स्वत: भेट देऊन विचारपूस केली. त्या सर्व आठही जणांची प्रकृती चांगली असल्याचे आमदार डॉ. शेट्यो यांनी सांगितले.
विद्यार्थिनींचे पालक बनले संतप्त

आपल्या मुलींवर असा प्रसंग ओढवल्याची माहिती मिळताच या विद्यार्थिनींचे पालक थेट डिचोली इस्पितळात दाखल झाले. त्यांच्यासह इतरही लोकांनी इस्पितळात धाव घेतली. यावेळी इस्पितळात उपस्थित असलेले शिक्षकवर्ग पाहून काही पालकांचा पारा चढला. अशा प्रकारची प्रकरणे यापूर्वीही घडली असताना विद्यालयाचे प्राचार्य, व्यवस्थापन गप्प कसे बसले ? आज आमच्या मुलींना काहीही झाल्यास कोण जबाबदार ? असे सवाल करीत पालकांनी आपला रोष व्यक्त केला.
नगराध्यक्षांसह माजी नगरसेवक व इतरांचे इस्पितळात मदतकार्य
या कठीणप्रसंगी डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी माहिती मिळताच इस्पितळात धाव घेतली. तसेच माजी नगरसेवक निसार शेख, फारूक आगा, नझीर बेग, निखिल दीक्षित व इतरांनी इस्पितळातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मदत केली. वॉर्डमध्ये अतिरिक्त खाट लावायला, ऑक्सिजन सिलेंडर आणण्यात, विद्यार्थिनींना रुग्णवाहिकेत हलविण्यासाठी व इतर कामांमध्ये या सर्वांनी मदत केली. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाला.
आमदारांकडून विद्यार्थिनींची जिल्हा रुग्णालयात विचारपूस
या प्रकाराची माहिती मिळताच डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी डिचोलीतील आरोग्याधिकारी डॉ. मेधा साळकर यांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थिनींना सर्व ती आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्याची सूचना केली. तसेच डिचोली, सांखळी व इतर ठिकाणांहून रुग्णवाहिका उपलब्ध करून प्रकृती अधिक गंभीर असलेल्या विद्यार्थिनींना म्हापसा येथे हलविण्यास मदत केली. या
विद्यार्थिनींची म्हापसा जिल्हा सामाजिक इस्पितळात जाऊन विचारपूस केली. म्हापसातील इस्पितळातही या मुलींना आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा केली.

निलंबित करण्याची आमदारांकडून सूचना
या प्रकरणाची सखोल चौकशी करून पेपर स्प्रे मारण्यात गुंतलेल्या विद्यार्थ्यांचा शोध लावण्याची सूचना आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी डिचोली पोलिसांना केली. तसेच या विद्यार्थ्यांची ओळख पटताच सदर विद्यार्थ्यांना निलंबित करण्याची सूचना आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी व्यवस्थापन मंडळाला केली आहे. या प्रकरणावर आमदार डॉ. शेट्यो लक्ष ठेवून होते.
गेल्याच आठवड्यात असाच प्रकार घडला होता
हा प्रकार घडलेल्या सदर उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये असाच प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता. दोन विद्यार्थ्यांनी भर वर्गात पेपर स्प्रे मारला होता. त्यावेळी त्याचा परिणाम तेवढा जाणवला नव्हता. या प्रकारात गुंतलेल्या विद्यार्थ्यांना नंतर समज देण्यात आली होती. तरीही त्यांनी पुन्हा अधिक तीव्रपणे पेपर स्प्रे मारून विद्यार्थिनींच्या जीवनाशी खेळ केला.
प्रथम वर्गात व नंतर खिडकीतून मारला स्प्रे
या प्रकरणाची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, पेपर स्प्रे मारणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम कला शाखेच्या वर्गात कोणीही नसल्याची संधी साधून सर्वत्र हवेत स्प्रे मारला व वर्गाचा दरवाजा बंद केला. ज्यामुळे सदर स्प्रेचा उग्र वास वर्गातच रहावा. त्यानंतर या वर्गात विद्यार्थिनी आल्या. त्यांना सदर स्प्रेच्या वासाची जाणीव होत असतानाच वर्गाच्या खिडकीतून विद्यार्थ्यांनी पुन्हा स्प्रे मारला. या स्प्रेचा तीव्रतेमुळे 11 विद्यार्थिनी श्वास कोंडला गेल्याने अस्वस्थ झाल्या. तसेच त्यांच्या डोळ्यांनाही जळजळ जाणवत होती.
डिचोली पोलिसांची विद्यालयात जाऊन केली चौकशी
डिचोली पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांनी पोलीस पथकासह सदर उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन चौकशी सुरू केली. यावेळी सदर विद्यालयाच्या वर्गांमध्ये व बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे आढळून आले. निरीक्षक राहुल नाईक यांनी प्राचार्य, शिक्षक व व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष व इतरांशी चर्चा केली व या प्रकारामागे कोण असू शकतो याचा अंदाज घेतला व सदर विद्यार्थ्यांना तत्काळ निलंबित करण्याची सूचना केली. तसेच त्या विद्यार्थ्यांचा अहवाल बाल कल्याण आयोगाकडे पाठविण्यात येणार असून त्यांच्या शिफारसीनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे, असे निरीक्षक राहुल नाईक यांनी सांगितले.
कोणाचीही गय करणार नाही : अध्यक्ष
या प्रकरणाची व्यवस्थापन मंडळाने चौकशी हाती घेतली आहे. यात गुंतलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ निलंबित करण्यात येणार आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी कडक पावले उचलली जाणार आहेत व काळजीही घेतली जाणार आहे, असे व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भविष्यावर लक्ष द्यावे की आपल्या सुरक्षिततेवर ?
या उच्च माध्यमिक विद्यालयात यापूर्वीही अशीच घटना घडली होती. त्याचवेळी संशयित विद्यार्थ्यांवर कारवाई होणे आवश्यक होते. अशा प्रकारचे असंवेदनशील प्रकार करून शैक्षणिक वातावरण बिघडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर व्यवस्थापन मंडळाने कठोर कारवाई करावी. उच्च माध्यमिक विद्यालयात मुलांनी शैक्षणिक भविष्य घडविण्याचे सोडून त्यांना आपल्या सुरक्षिततेसाठी चिंताग्रस्त व्हावे लागल्यास त्यांचे अभ्यासावर कसे लक्ष राहणार, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक भगवान हरमलकर यांनी व्यक्त केली.
दोषींवर कडक कारवाई व्हावी : निसार शेख
सदर उच्च माध्यमिक विद्यालयात घडलेला हा प्रकार दुर्दैवी आहे. या स्प्रेमुळे या मुलींवर कोणतीही परिस्थिती ओढवू शकली असती. या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी व दोषी आढळणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई व्यवस्थापनाने करावी व यापुढे असे प्रकार घडू नये याचीही काळजी घ्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक निसार शेख यांनी केली.









