नागरिकात भीती : वनखात्याचे साफ दुर्लक्ष : हत्तीच्या स्थलांतराचे नियोजन कोलमडले
खानापूर : गेल्या दीड महिन्यापूर्वी टस्कर हत्तीने जळगा, चापगाव परिसरात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर वनखात्याने प्रयत्न करून या हत्तीला पिटाळून लावले होते. सदर हत्ती हलशी परिसरात गेला होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा जळगा गावाजवळच ठाण मांडल्याने जळगा, चापगाव परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून, सुगीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. हत्तीकडून भात आणि ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे. असे असताना वनखात्याने हत्तीच्या बंदोबस्ताकडे साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
टस्कर हत्ती गेल्या वर्षापासून खानापूर परिसरात वास्तव्यास आहे. यापूर्वी या हत्तीने निलावडे परिसरातील गावात धुमाकूळ घातला होता. ऑक्टोबर महिन्यात हा हत्ती रुमेवाडी येथून नंदगड, बेकवाड येथून चापगाव, जळगा परिसरात आला होता. त्यावेळीही हत्तीने बराच धुमाकूळ घालून शेतीचे प्रचंड नुकसान केले होते. वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतत आठ दिवस प्रयत्न करून हत्तीला जंगलात हाकलण्यात यश मिळविले होते. मात्र गेल्या आठ दिवसापासून हा हत्ती जळगा परिसरात पुन्हा दाखल झाला आहे. जळगा येथील तलावाशेजारी शेतात कायम वास्तव्य करून राहिल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हत्तीच्या दहशतीमुळे सुगीच्या कामात व्यत्यय
सध्या ऊस तोडणी आणि भाताच्या मळण्या सुरू आहेत. अशातच हत्तीच्या दहशतीमुळे सुगीच्या कामात व्यत्यय निर्माण होत आहे. वनखात्याकडे हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी करूनदेखील वनकर्मचारी या हत्तीच्या बंदोबस्तासाठी साधे फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वनाधिकाऱ्यांकडून परवानगी नसल्याने स्थलांतर बारगळले
गेल्या महिन्यापूर्वी जळगा परिसरात वास्तव्यास होता. त्यावेळी वन कर्मचाऱ्यांनी हत्तीला पकडून स्थलांतर करण्यासाठी नियोजन केले होते. मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवरुन कोणताही परवाना मिळत नसल्याचे कारण सांगून खानापूर वनाधिकारी हात झटकत आहेत. या हत्तीला पकडून शिमोगा येथील शिबिरात हलवण्याचे नियोजन होते. मात्र याबाबत कारवाई होताना दिसत नाही. याबाबत वनाधिकारी सुनिता निंबरगी यांना विचारले असता राज्य वनाधिकाऱ्यांकडून या हत्तीच्या स्थलांतरासाठी परवानगीची आवश्यकता आहे. यासाठी पत्र व्यवहारही करण्यात आला आहे. मात्र अद्याप वरिष्ठांकडून आवश्यक असलेली परवानगी देण्यात आली नसल्याने आम्हाला कोणतीही कारवाई करता येत नाही. तसेच हत्तीला पकडून स्थलांतर करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची आवश्यकता असते. यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. जर परवानगी मिळाल्यास तातडीने हत्तीचा बंदोबस्त करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.









