परिसरात धुमाकूळ सुरूच ‘हत्ती’ने उडवली वनाधिकाऱ्यांची झोप : आता बेळवटी भागाकडे मोर्चा
वार्ताहर /किणये
राकसकोप परिसरात आलेल्या हत्तीने वन अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे. गेल्या आठवडाभरापासून ठाण मांडून बसलेल्या या हत्तीने रविवारी सकाळी आपला मोर्चा बेळवट्टी शिवाराकडे वळविला आहे. आठ दिवसापासून हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी व त्याला हुसकावून लावण्यासाठी वन खात्याकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही केल्या हत्ती या परिसरातून जात नाही. वन खात्याचे अधिकारी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. हत्तीचा वावर या परिसरात वाढला असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजता बेळवट्टी गावच्या वेशीजवळ हा हत्ती आला होता. अगदी गावाला लागूनच सागर गाडेकर यांचा पोल्ट्री फार्म आहे. त्याच्या बाजूलाच बुटीटेक म्हणून शिवार आहे. या ठिकाणी रविवारी सकाळी दीड तास हाती ठाण मांडून होता. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाले होते. त्यानंतर हा हत्ती सकाळी दहाच्या दरम्यान बेळवट्टी-कर्ले रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या उंबळ शेताजवळ आला.
काही तऊणांनी हत्तीचा व्हिडिओ काढून् घेतला तो व्हिडिओ रविवारी दिवसभर सर्वत्र व्हायरल करण्यात आला होता. बेळधट्टी गावाजवळील काजूच्या बागेमध्ये रविवारी दिवसभर हा हत्ती फिरत होता. गेल्या आठ दिवसापासून हत्तीचा वावर राकसकोप धरणाजवळील परिसरात आहे. शनिवारी दिवसभर या हत्तीला हुसकावून लावण्यासाठी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र याच हत्तीने रविवारी सकाळी आपला मोर्चा बेळवट्टी शिवाराकडे वळविला आहे. त्यामुळे आता हतीचा बंदोबस्त वन अधिकारी करणार कधी असा सवाल उपस्थित होत आहे. या परिसरात सध्या रताळी लागवड, ऊस लागवड व मिरची रोप लागवड करण्यात येत आहे. या कोवळ्या पिकात या हत्तीने घुसून नासाडी केली आहे अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. रविवारी दिवसभर सदर हत्ती बेळवट्टी परिसरातील शिवारात फिरत होता. तो काजूच्या बागांमधून फेरफटका मारत होता .सध्या काजू काजू बागायतदार बागेची साफसफाईची करू लागले आहेत.
अन् हत्ती बिथरला!
हत्ती चंदगड भागातून आला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शनिवारी वन खात्याचे अधिकाऱ्यांनी धरण परिसराजवळ बॉम्ब लावून त्याला हुसकावून लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यामुळे आता हत्ती बिथरलेला असावा. तो दिसेल त्याचा पाठलाग करत आहे. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
हत्तीने केला कुत्र्याचा पाठलाग
रविवारी सकाळी बेळवट्टी रस्त्याजवळील एका काजूच्या बागेमध्ये आला. त्यावेळी कुत्र्याच्या पिल्लाचा पाठलाग केला. काजूच्या बागेतील कुत्र्याचे पिल्लू अन् हत्ती यांचा मजेशीर, जुगलबंदी व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला होता. तो रविवारी दिवसभर वायरल झाला होता.









