मळणीसाठी ठेवलेल्या भाताचे तुडवून नुकसान
वार्ताहर /नंदगड
झाडनावगा येथे गेल्या चार दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या हत्तीनी आपला मोर्चा आता कौंदल शिवारात वळविला आहे. कौंदल येथील शेतकरी पुंडलिक कोलेकर यांनी आपल्या शेतात मळणी करण्यासाठी ठेवलेल्या भाताचे खाऊन तुडवून नुकसान केले आहे. यामध्ये दोन हत्ती असल्याचे सांगण्यात येते. झाडनावगा व कौंदलच्या सिमेलगत दोन तलाव आहेत. या तलावातून मुबलक पाणी आहे. शिवाय जवळच जंगल असल्याने हत्तीना येथे राहण्यासाठी उत्तम जागा आहे. त्यामुळे हत्तीनी येथे ठाण मांडले आहे. हत्ती दिवसा जंगलात तर सायंकाळी व रात्री अन्नाच्या शोधात आसपासच्या शेतवडीत फिरत आहेत.
कौंदल गाव खानापूर शहरापासून अवघ्या तीन कि. मी. अंतरावर आहे. या शेतवडीच्या एका बाजूने खानापूर-तालगुप्पा राज्यमार्ग तर दुसऱ्या बाजूने बेळगाव, पणजी हायवे आहेत. दोन्ही रस्त्यावर दिवस रात्र नेहमीच दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ असते. हे हत्ती जंगल किंवा शिवारात केंव्हा रस्त्यावर येतील याची शाश्वती नाही. त्यामुळे प्रवासी वर्गही जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. तर केवळ 1 कि. मी. वर कौंदल गाव असल्याने हत्ती गावातही येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तीन वर्षापूर्वी याच शेतवडीत कौंदल गावातील गणपती पाटील या शेतकऱ्यांवर अस्वलानी हल्ला केला होता. या घटनेत गणपती पाटील यांचा मृत्यू झाला होता. ही घटना सर्वांनाच माहित असताना आता गावच्या शेतवडीत हत्ती दाखल झाल्याने गावकऱ्यांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीना घनदाट जंगलात हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.









