ऊस, केळी पिकांचे नुकसान: शेतकरी हतबल, वनखाते उदासीन
बेळगाव : मागील 15 दिवसांपासून स्थिरावलेल्या चाळोबा गणेश नावाच्या हत्तीने बेकिनकेरे परिसरातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान सुरूच ठेवले आहे. शनिवारी रात्री अर्जुन भोगण यांच्या शेतातील ऊस, केळी आणि इतर पिकांमध्ये धुमाकूळ घालून नुकसान केले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शिवाय वनखातेही हत्तीला हुसकावून लावण्यात अपयशी ठरले आहेत. मागील काही दिवसांपासून या हत्तीने शेती पिकांमध्ये हैदोस घालून शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. वनखाते मात्र याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. मात्र उभ्या पिकांत हत्ती धुमाकूळ घालत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दररोज या हत्तीकडून परिसरातील शेती पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतूनही वनखात्याच्या दुर्लक्षपणाबाबत संताप व्यक्त होऊ लागला आहे.
अन्यथा वनखात्याला घेराव घालण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
मूळचा आजरा येथील असलेला हत्ती मागील काही दिवसांपासून बेकिनकेरे परिसरात ठाण मांडून आहे. रात्रीच्यावेळी शिवारात घुसून उभ्या पिकांचे नुकसान करू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रताळी काढणीला आली असतानाच हत्तीचा दहशत वाढल्याने शेताकडे जाणेही धोक्याचे बनले आहे. वनखात्याने या हत्तीचा बंदोबस्त करावा अन्यथा वनखात्याला घेराव घालण्याचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.









