आता हेच पिक हत्तीकडून उध्वस्त होताना शेतकऱ्यांना पहावे लागत आहे
आजरा : आजरा तालुक्याच्या पूर्व विभागात एक तर दुसरा हत्ती पश्चिम विभागात तळ ठोकून आहे. हातातोंडाशी आलेली पिके हत्तींकडून उध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तालुक्यातील या हत्तींचा बंदोबस्त होणार तरी कधी असा संतप्त सवाल तालुक्याच्या पूर्व व पश्चिम विभागातील शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
सुमारे 16 वर्षांपूर्वी तालुक्यात हत्तींचे आगमन झाले. सुरूवातीच्या काळात हत्तींचे कळप आले आणि परतले मात्र दोन हत्तींनी तालुक्यातच ठाण मांडले आहे. हत्तींकडून वारंवार होणाऱ्या पिकांची नुकसानी आणि पंचनामे करून वनविभागाकडून दिली जाणारी भरपाई असा नित्यक्रम इथला बनला आहे. मात्र मिळणारी भरपाई शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या उभ्या राहू लागल्या आहेत.
हत्तीबरोबरच गव्यांच्या भितीने जंगलालगत असलेली चांगली कसदार जमीन पिकावीना पडून राहीली आहे. तर गावालगत आणि शिवारात असलेल्या शेतातील पिकांमध्ये हत्तींचा धुमाकूळ सुरू असल्याने पिके वाचवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. यावर्षी मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे खरीप पेरणी व भात रोप लावणी करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती.
रोप लावणीचे तरवे कुजून गेल्याने मिळेल त्या भाताच्या वाणाचे तरवे 15 ते 20 रूपये दराने पेंडी खरेदी करून शेतकऱ्यांनी शेतामध्ये रोप लावणी केली. मात्र आता हेच पिक हत्तीकडून उध्वस्त होताना शेतकऱ्यांना पहावे लागत आहे. हत्तींकडून भात पिकाबरोबरच ऊस पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवाय नारळ, काजूची झाडांचेही नुकसान हत्ती करीत असून मेसकाठीचे कोवळे कोंब हत्तीचे आवडते खाद्य असल्याने मेसकाठी व बांबूचेही हत्ती नुकसान करीत आहेत.
एका बाजूला तालुक्यात बांबू लागवडीसाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला हत्तीकडून बांबू उध्वस्त केला जात असताना बांबू लागवड करायची की नाही असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शासनाने बांबू लागवड मोहिम हाती घेतली आहे या मोहिमेला यश यायचे असेल तर तालुक्यातील हत्तींचा बंदोबस्त करण्याची मोहिमही शासनाला हाती घ्यावी लागेल असे मत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केले.








