गेल्या पाच-सहा दिवसांपासून वावर : पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान : नागरिक भयभीत हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी
वार्ताहर / किणये
राकसकोप परिसरात हत्तीने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून हत्तीचा वावर राकसकोप धरणाजवळील परिसरात आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता गावातील काही नागरिकांना हत्ती दिसला. हत्ती गावच्या वेशीजवळ आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दिवसभर या हत्तीला हुसकावून लावण्यासाठी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, ते निष्फळ ठरले. हत्ती या परिसरातच ठाण मांडून असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात राकसकोप गावामध्ये डेअरीला दूध देऊन दुचाकीवरून घरी जात असताना एका शेतकऱ्याला रात्रीच्यावेळी हत्ती दिसला. त्यावेळी नागरिकांनी हत्तीला हुसकावून लावले.
दवंडी देऊन नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
या हत्तीने मिरची, बटाटा, रताळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्ती आल्याचे राकसकोप गावामध्ये दवंडी देऊन नागरिकांना सतर्कतेचे आवाहनही केले. त्यानंतर हा हत्ती बिजगर्णी, येळेबैल, सोनोली शिवाराकडे आला. या परिसरात डोंगर-झाडी असून ऊस पीकही आहे. कदाचित या डोंगरामध्ये किंवा ऊस पिकामध्ये हत्ती बसला असावा, अशी चर्चा सुरू होती. गेल्या दोन दिवसांपूर्वी कर्ले गावच्या वेशीजवळ हत्ती आला होता. हत्तीने कर्ले शिवारातील कोथिंबीर, बटाटा व इतर भाजीपाला पिकांचे नुकसान केले. पहाटेच्या दरम्यान हत्ती आला अशी चर्चा कर्ले गावामध्ये सुरू होती. त्यामुळे गावातील शेतकरीसुद्धा भयभीत झाले होते.
शुक्रवारी दिवसभर हत्ती कोणाच्याही निदर्शनास आला नाही. मात्र शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान राकसकोप गावाजवळील धरण परिसरात हा हत्ती नागरिकांना दिसला. त्यानंतर लागलीच वन खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. वन खात्याचे अधिकारी राकसकोप गावात दाखल झाले. शनिवारी जवळपास सहा ते सातवेळा हत्ती नागरिक व वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला.हा हत्ती शनिवारी दिवसभर धरणाजवळ असलेल्या डोंगर झाडीमध्ये होता. हत्तीला हुसकावून लावण्यासाठी बॉम्बचा वापरही वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी केला. तरीही त्यांना यश आले नाही. हत्तीला पाहण्यासाठी गावातील व भागातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने धरणाजवळ गर्दी केली होती. राकसकोप शिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात हत्तीने नुकसान केले आहे. या भागात सध्या ऊस लागवड व मिरची लागवड करण्यात येत आहे. या पिकांमध्ये हत्ती घुसून नासाडी केली आहे, अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे.
या हत्तीचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी या भागातील नागरिक व शेतकरी करीत आहेत. सदर हत्ती हा चंदगड डोंगर भागातून आला असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान धरणाजवळील झाडीतून हत्ती बाहेर आला. राकसकोप गावामध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र वन खात्याचे अधिकारी तिन्ही बाजूने उपस्थित होते. त्यामुळे पुन्हा हत्ती झाडाझुडपांमध्ये निघून गेला आहे. रात्री 9 वाजेपर्यंत वन खात्याचे अधिकारी या परिसरात ठाण मांडून होते.









