नारळ, केळी, सुपारीचे नुकसान : त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी
वार्ताहर/गुंजी
गेल्या दहा-बारा दिवसांपासून गुंजी परिसरात ठाण मांडलेल्या हत्तींनी अक्षरशा धुमाकूळ घातला असून येथील ऊस पिकानंतर आता आपला मोर्चा नारळ, केळी, सुपारी, फणस अशा बागायती पिकांकडे वळविला आहे. मागील आठवडाभर येथील जैनू नाळकर यांच्या पाच एकरातील उसाचा संपूर्ण फडशा पडल्यानंतर रविवारी रात्री कृष्णा केशव बांदोडकर यांच्या बागेतील 12 नारळाची झाडे आणि केळीच्या झाडांचे नुकसान केले आहे. तसेच शिवाजी बांदोडकर यांच्याही नारळांच्या झाडाचे नुकसान केले आहे. त्याचबरोबर जी. ई. गंगाधर यांच्या बागेच्या सभोवताली तारेचे कुंपणमध्ये शिरून नारळ, सुपारी आणि फणसाच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याची माहिती येथील रेंज फॉरेस्टर राजू पवार यांना समजतात लोंढा वनाधिकारी तेज वाय. पी. यांच्यासह प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला.
वीट मजुरांमध्ये घबराट
सदर हत्तींच्या कळपामध्ये सात मोठे हत्ती व दोन पिल्लांचा समावेश असून आहे. सध्या या भागामध्ये वीट व्यवसाय सुरू असून अनेक वीट कामगार झोपडीमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र सततच्या हत्तांrच्या उपद्रवामुळे येथील वीट कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. परगावच्या वीट मजुरांची गोची झाली असून त्यांना नाईलाजाने वास्तव्य करावे लागत आहे.
भरपाई देऊन बंदोबस्त करावा
दहा-बारा दिवसांपासून या परिसरात ठाण मांडलेल्या या हत्तींनी अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी व हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









