वनखात्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी : भरपाईचे आश्वासन
बेळगाव : धामणे (एस) परिसरात मागील दोन दिवसांपासून हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ऊस, भात, रताळी आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची वनखात्याचे आरएफओ पुरुषोत्तम रावजी आणि कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. शिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. दरवर्षी नोव्हेंबरपासून धामणे, बैलूर, हजगोळी (ता. चंदगड) आदी परिसरात हत्तींच्या कळपाकडून नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. मात्र, वनखाते याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. सुगी हंगामादरम्यान वन्यप्राण्यांकडून नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. हातातोंडाला आलेली पिके हत्तींकडून नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. वनखात्याने रस्त्याशेजारी आणि वनप्रदेशात जागृती फलक लावले आहेत. काही नागरिकांकडून वन्यप्राण्यांना डिवचण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. त्यामुळे संभाव्य दुर्घटना लक्षात घेऊन वनखात्याने जागृतीचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत असलेला हत्तींचा कळप नोव्हेंबरपासून कर्नाटकातील धामणे, बैलूर परिसरात स्थलांतरित होतो. त्यानंतर येथील शेतीचे मोठे नुकसान होते. दरवर्षी शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गावांना वन्यप्राण्यांचा त्रास होऊ लागला आहे.
नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करणार
बैलूर, धामणे परिसरातील नुकसानग्रस्त शेतीला भेट दिली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी प्रयत्न होणार आहेत. डोंगर परिसरात चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांकडून शेतीतील पिकांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे.
– पुरुषोत्तम रावजी, आरएफओ बेळगाव









