भुईमूग, मका, उसाचे नुकसान : शेतकऱ्यांत भीती, खबरदारी घेण्याचे आवाहन
बेळगाव : बेकिनकेरे, अतिवाड, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी परिसरात रविवारी हत्तीने धुमाकूळ घातला आहे. भुईमूग, ऊस, मका आणि भाजीपाला पिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वनखात्याने तातडीने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी शेताकडे जाणे टाळावे, असे आवाहनही वनखात्याने केले आहे. बेकिनकेरे-कोवाड मार्गावरील कर्नाटक-महाराष्ट्र सीमा हद्दीवर रविवारी सकाळी प्रवाशांना हत्तीचे दर्शन झाले. त्यानंतर याबाबतचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना खबरदारी म्हणून सूचना करण्यात आल्या आहेत. डोंगर पायथ्याशी रविवारी सकाळी निदर्शनास आलेल्या हत्तीने शनिवारी रात्री म्हाळेनट्टी, अतिवाड, चलवेनहट्टी, परिसरातील शेती पिकांत धुमाकूळ घातला आहे.
त्यामुळे उन्हाळी भुईमूग, मका आणि भाजीपाला पायाखाली सापडून नुकसान झाले आहे. अतिवाड जलाशय परिसरात हा हत्ती काही शेतकऱ्यांना निदर्शनास आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्ती मूळचा आजरा तालुक्यातील असून त्याच्या मूळ अधिवासात हुसकावून लावण्यासाठी वनखात्याची टीम प्रयत्न करीत असल्याची माहितीही वनखात्याने दिली आहे. मागील महिन्याभरापासून चाळोबा गणेश हा हत्ती चंदगड तालुक्यातील राजगोळी परिसरात स्थिरावला होता. मात्र शनिवारी रात्री तो कर्नाटक-महाराष्ट्र सीमा हद्दीवरील बेकिनकेरे, अतिवाड, कौलगे परिसरात दाखल झाला आहे. रविवारी सकाळी तो उचगाव, कोवाड, रस्ता ओलांडून कौलगेच्या दिशेने डोंगरात गेला आहे. हत्तीवर नजर ठेवण्यासाठी वनखात्याचे कर्मचारी डोंगर पायथ्याशी तळ ठोकून असल्याचेही सांगण्यात आले आहे.
रात्री शेताकडे शेतकऱ्यांनी जाऊ नये
हत्ती दाखल झालेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देण्यासाठी किंवा इतर कामासाठी शेताकडे जाऊ नये, विशेषत: डोंगर पायथ्याशी शेत असलेल्या शेतकऱ्यांनी शेताकडे जाणे टाळावे, असे आवाहनही वनखात्याने केले आहे.
चाळोबा गणेश दुसऱ्या वर्षीही दाखल
मूळचा आजारा जंगल परिसरातील असलेला चाळोबा गणेश नावाचा हत्ती सलग दुसऱ्या वर्षी बेकिनकेरे परिसरात दाखल झाला आहे. गतवर्षी 1 मार्च रोजी तो बेकिनकेरे गावातून गेला होता. दरम्यान दुचाकी, ट्रॅक्टर, इतर साहित्याचे नुकसान केले होते. यंदा तो पुन्हा गावाजवळ आल्याने जुन्या आठवणी उजाळा मिळाला आहे.
तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
डोंगर क्षेत्रात आलेल्या हत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा, सध्या डोंगर क्षेत्रात गेलेला हत्ती पुन्हा मानवी वसतीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी वनखात्याने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
नागरिकांनी हुल्लडबाजी करू नये
आजरा डोंगर क्षेत्रातील हा चाळोबा गणेश नावाचा हत्ती आहे. त्याला मूळ आदीवासात हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी हुल्लडबाजी करू नये, कोणीही दगड आणि इतर साहित्याने डिवचू नये, तो आपल्या वाटेने निघून जाईल, नागरिकांनी शांतता राखून वनखात्याला सहकार्य करावे.
– प्रशांत आवळे (वनक्षेत्रपाल पाटणे)









