वनखाते ठरले अपयशी : शेतकऱ्यांमध्ये संताप, चाळोबा गणेश स्थिरावला
बेळगाव : मागील पाच दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमा हद्दीवरील डोंगरात स्थिरावलेल्या हत्तीने दहशत माजविली आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात उतरून पिकांचे नुकसान सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होऊ लागली आहे. ऊस मका, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. दरम्यान हत्तीला हुसकावून लावण्यात वनखात्याला सपशेल अपयश आले आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांची मात्र पूर्णपणे झोप उडाली आहे.
मूळचा आजरा (जि. कोल्हापूर) येथील चाळोबा गणेश नावाचा हत्ती बेळगाव तालुक्यातील सीमेवर बेकिनकेरेनजीक असलेल्या छोट्याशा डोंगरात आला आहे. शिवाय मागील पाच दिवसांपासून तो याच ठिकाणी स्थिरावला आहे. वनखाते या हत्तीला मूळ आदीवासात हुसकावण्यासाठी डोंगर पायथ्याशी तळ ठोकून आहे. मात्र हत्ती रात्रीच्यावेळी शिवारातील पिकांवर ताव मारून पुन्हा डोंगरात विश्रांती घेत आहे. गतवर्षीही या हत्तीने तब्बल 15 ते 20 दिवस या परिसरात दहशत माजविली होती. पुन्हा एक वर्षाने हा हत्ती या ठिकाणी दाखल झाला आहे. वनखाते या हत्तीला जेरबंद करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत असल्याचा संतापही शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
बुधवारी रात्री पिकांमध्ये धुमाकूळ
डोंगर क्षेत्रात स्थिरावलेल्या चाळोबा गणेश हत्तीने डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान कृषी पंप, पाईप आणि पाण्याची टाकी व इतर साहित्यांची नासधूस केली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला फटका बसला आहे. शिवाय डोंगर क्षेत्रात हत्ती आल्याने शेतकऱ्यांनाही भीतीच्या छायेखालीच वावरावे लागत आहे.









