बॅरिकेडिंग तोडून एका अरुंद गल्लीत शिरला
अहमदाबाद:
येथे रथयात्रेदरम्यान शुक्रवारी गोंगाटामुळे एक हत्ती बिथरला. हा हत्ती बॅरिकेडिंग तोडून एका अरुंद गल्लीत शिरला, यादरम्यान झालेल्या धावपळीत एक इसम जखमी झाला आहे. तर वेळीच हत्तीला शांत करण्यास यश आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अहमदाबादच्या कांकरिया प्राणिसंग्रहालयाचे अधीक्षक आर.के. साहू यांनी दोन अन्य हत्तींवर सवार माहूत हत्तीचा पाठलाग करत त्याला नियंत्रित करत राहिल्याचे सांगितले.
खाडिया भागात हत्ती शिरल्याने एक इसम जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रथयात्रेचा कार्यक्रम सुरू ठेवण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त कोमल व्यास यांनी सांगितले आहे. 400 वर्षे जुन्या जगन्नाथ मंदिरातून सुरू झालेली रथयात्रा शहराच्या जुन्या भागातून निघाली आहे. या रथयात्रेत 16 किलोमीटरचे अंतर कापण्यात आले आहे. रथयात्रेत अचानक तीव्र संगीत सुरू झाल्याने हत्ती बिथरून पळू लागला आणि निर्धारित मार्गावरून भटकल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात हत्ती एका अरुंद गल्लीत शिरण्यापूर्वी बॅरिकेडिंग तोडताना आणि गर्दीत पळताना दिसून येतो. हत्तीला कुठल्याही ट्रँक्विलाइजरच्या मदतीशिवाय त्वरित शांत करण्यात आले आहे. कांकरिया प्राणिसंग्रहालय, वन विभाग आणि पशुचिकित्सक हत्तींवर नजर ठेवून आहेत. तीन टीम्सना ट्रँक्विलाइजिंग गनसोबत मार्गावर तैनात करण्यात आल्याचे साहू यांनी सांगितले आहे.









