बेळगाव : गणेशोत्सवात विजेच्या कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी संपूर्ण शहरात मंडळांच्या सूचनांनुसार दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून शहराच्या मुख्य भागासोबत शहापूर, वडगाव, अनगोळ तसेच उत्तर भागातही दुरुस्तीचे काम केले जात आहे. शिवाजी रोड येथील मंडळाच्या मागणीनुसार एलटी ओव्हरहेड लाईन काढून त्या ठिकाणी एरियल बंच केबल घालण्यात आल्या. विसर्जनाच्यावेळी विद्युतवाहिन्यांना स्पर्श होऊन कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी जुन्या विद्युतवाहिन्या काढून त्या ठिकाणी एरियल बंच केबल घालण्यात आल्या आहेत. याचबरोबर शहराच्या इतर भागातही हेस्कॉमकडून दुरुस्ती केली जात आहे. खडक गल्ली, पोस्टमन सर्कल परिसर, मुजावर गल्ली, आझाद गल्ली, खंजर गल्ली, भातकांडे गल्ली यासह परिसरात दुरुस्तीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले आहे. याबरोबरच शहापूरमधील नार्वेकर गल्ली, पवार गल्ली तसेच वडगाव परिसरातही विद्युतवाहिन्यांची उंची तसेच लोंबकळणाऱ्या वाहिन्या दुरुस्त करण्यात आल्या.
दुरुस्तीचे काम सुरू
बेळगावचा गणेशोत्सव उत्साहात पार पडावा, यासाठी हेस्कॉमकडूनही खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार धोकादायक तसेच मंडळांनी केलेल्या सूचनेनुसार दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे.
– संजीव हम्मण्णावर (साहाय्यक कार्यकारी अभियंता)









