आपला कारभार सुधारावा अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन; सत्यजित देशमुख यांचा इशारा
शिराळा /प्रतिनिधी
महावितरणच्या अनागोंदी कारभाराने सामान्य जनता व शेतकरी हैराण झाली आहे. शेती पंपाचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तर घरगुती वीज पुरवठा देखील अनियमित आहे. मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाड होत आहे. जनतेमध्ये महावितरण कंपनी विरोधात मोठा रोष असून महावितरण कंपनीने आपला कारभार सुधारावा अन्यथा वीज वितरण कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा भाजपा नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी दिला आहे.
सत्यजित देशमुख म्हणाले, गेल्या दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा त्रास सामान्य जनतेला होत आहे. शेती पंपाचे लोडशेडिंग अगोदरच शेतकऱ्यांवर लादले असताना. जादाचे लोडशेडिंग केले जात आहे.अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बिघाड झाले आहेत तो बंद ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लावला जातो. कमी दाबाचा वीजपुरवठा वारंवार होत असल्याने शेती पंप बंद राहतात. अशा अनेक तक्रारी आहेत. शेतकरी त्रासला आहे. पिके पाण्याअभावी वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या वर्षाच्या महापुरामुळे वीज वितरणचे पडलेले विजेचे डांब अजूनही काही ठिकाणी बसवलेले नाहीत.तर चार-पाच वर्षांपूर्वीपासून शेती पंपाच्या वीज कनेक्शनची जोडणी देखील झालेली नाही. निव्वळ उडवा उडवीची उत्तरे या संबंधित अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना व जनतेला मिळत आहेत. याहून कहर म्हणजे अनेक लोकांना वीज कनेक्शन न जोडता ही विजेची बिले दिली गेली आहेत. ही बाब अन्यायकारक असून वीज बिले थकली की अधिकारी वीज कनेक्शन तोडणीसाठी येतात. परंतु शेतकर्यांना नियमित वीज देण्याचे नियोजन मात्र महावितरणकडे नाही.त्यामुळे महावितरणने आपला कारभार सुधारावा अन्यथा वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा सत्यजीत देशमुख यांनी दिला आहे.