बन्च केबल प्रकल्प ठरला सपशेल अपयशी : वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती,पूर्ण अभ्यासाअंती घेणार पुढील निर्णय
पणजी : वीज वहनासाठी वापरण्यात आलेले बन्च केबल्स हेच सध्याच्या सतत होणाऱ्या वीज खंडित प्रकारामागील कारण आहे, असे मत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे. हा प्रकल्प सपशेल अपयशी ठरला असून सदर केबल्स का वापरण्यात आले, त्यामागील कारणांचा सध्या आम्ही अभ्यास करत आहोत, त्याशिवाय या मुद्यावर आपण विधानसभेतही बोलणार आहे, असेही ते म्हणाले. शुक्रवारी पणजीत वीज मुख्यालयात सर्व वीज अभियंत्यांची बैठक घेतल्यानंतर वीजमंत्री पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडीस यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत खात्याचा महसूल कसा वाढविता येईल, या मुद्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. हे केबल्स टाकण्यात आले तेव्हा सध्याचे अभियंते नव्हते. तसेच या खात्याचा मंत्री कोण होता हेही आपणास माहीत नसल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
उत्तर गोवा वीज अभियंत्यांची बैठक
गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे खास करून उत्तर गोव्यात लोकांनी संताप व्यक्त केला होता. वीजमंत्र्यांनी त्याची गंभीरतेने दखल घेत उत्तर गोव्यातील प्रत्येक तालुका उपवीज कार्यालयांतील अभियंत्यांची काल शुक्रवारी बैठक घेऊन या सर्व समस्या सोडविण्याचे प्रयत्न करण्यात आले.
यंत्रणा कर्नाटन निवडणुकीत व्यस्त
प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी मुख्य उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांच्या परिसरात वृक्षांची छाटणी आदी कामे हाती घेऊन वीज पुरवठ्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात येते. यंदा नुकतीच कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. त्यामुळे सर्व यंत्रणा त्यात व्यस्त राहिली. परिणामी खास करून दक्षिण गोव्याला वीज पुरवठा करणाऱ्या तेथील वाहिन्यांची देखभाल करणे झालेच नाही. ते काम त्यांनी ऐन पावसाच्या तोंडावर हाती घेतले आहे. त्याचा परिणाम दक्षिण गोव्यातील वीज पुरवठ्यावर झाला, असे ढवळीकर म्हणाले.
दक्षिण गोव्यातील समस्या सुटणार
उत्तर गोव्यात कळंगूट सारख्या भागात होणारी वीज समस्या 90 टक्के सोडविण्यात यश आले आहे. ही समस्याही उच्च दाबाच्या वीज वाहिन्यामुळेच निर्माण झाली होती. पेडणे तालुक्यात मांद्रे येथे वीज उपकेंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय वेर्णा येथे 50 एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार असून त्याचेही कार्यान्वयन याच महिन्यात होणार आहे. त्यानंतर वेर्णा, कुंकळ्ळी, सासष्टी, आणि पेडणे या भागातील वीज समस्या पूर्णत: सुटणार आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.
किनारपट्टी विजेतही होणार सुधारणार
त्याशिवाय लवकरच साळगाव भागात सुमारे 350 कोटी ऊपये खर्च करून उपविजकेंद्र स्थापन करण्यात येणार असून त्यानंतर कळंगूट, पर्वरी, म्हापसा शिवोली, बागा यासह संपूर्ण किनारी पट्ट्यातील गावांची वीज समस्या सुटणार आहे, असे ढवळीकर म्हणाले.
ऑगस्टपर्यंत 200 लाईनमनची नियुक्ती
वीज खात्याकडे मुबलक कर्मचारी आहेत. त्याशिवाय लवकरच म्हणजे ऑगस्टपर्यंत सुमारे 200 लाईनमनची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.









