मंत्री एम. बी. पाटील यांचे स्पष्टीकरण
बेंगळूर : आपल्या सरकारने वीज दरवाढ केलेली नाही. राज्यात काँग्रेस सत्तेवर येण्यापूर्वीच दरवाढ करण्यात आली आहे. त्याच्याशी आपला संबंध नाही. केईआरसीने ही वीज दरवाढ लागू केली आहे. मात्र, हा निर्णय मागे घेतला जाणार नाही, असे अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी स्पष्ट केले. उद्योजकांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. विजापूर येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, वीज दरवाढ आपल्या सरकारने केलेली नाही. स्वायत्तता असलेल्या केईआरसीने हा निर्णय घेतला, तो देखील आपला पक्ष सत्तेवर येण्याआधी. त्यामुळे वीज दरवाढीचा आपल्याशी कोणताही संबंध नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अलीकडेच याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. तरी सुद्धा आपण मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करणार आहे, असे मंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले. कृपया उद्योजकांनी सरकारला सहकार्य करावे. केईआरसीकडून वेळोवेळी वीज दरवाढ केली जाते. यापुढेही ते वेळोवेळी करू शकतील. सर्वांनी सहकार्य करावे. मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांच्याशी चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी जे काही करता येईल ते करू, असे आश्वासनही एम. बी. पाटील यांनी दिले.
चार दिवस विलंब झाला तरी….
राज्यात मोफत तांदूळ वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकार तांदळाच्या बाबतीत राजकारण करत आहे. राज्य सरकारने केंद्राला पत्र पाठविल्यानंतर 7 लाख मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. नंतर नकार देण्यात आला. केंद्राने गरीब जनतेला वितरीत होणाऱ्या तांदळाच्या मुद्द्यावरून राजकारण करणे योग्य नाही. आम्ही फुकट तांदूळ मागत नाही, पैसे देऊन मागत आहे. चार दिवस विलंब झाला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत अन्नभाग्य योजनेतून 10 किलो तांदूळ देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. मंत्री दिल्लीला रवाना झाल्याबद्दल बोलताना ते म्हणाले, सगळेच मंत्री दिल्लीला गेलेले नाहीत. मुख्यमंत्री गेले आहेत. त्यांच्यासोबत काही मंत्री गेले आहेत. ते आपापल्या खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतील. आमचा रोड मॅप तयार झाल्यावर मी देखील दिल्लीला जाईन. या महिन्याच्या 27 तारखेनंतर बैठक होणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहे. ते आमच्या खात्याशी संबंधित प्रस्ताव स्वीकारतील, असे त्यांनी सांगितले.









