केईआरसीकडे आक्षेप नोंदविण्याची संधी : आज हुबळी येथे बैठक
बेळगाव : वाढत्या वीजबिलाने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता आणखी एक शॉक बसणार आहे. कर्नाटक विद्युत नियामक मंडळाने (केईआरसी) वीजबिल वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. आक्षेप नोंदविण्यासाठी गुरुवार दि. 27 रोजी हुबळी येथे बैठक बोलाविण्यात आली आहे. नागरिक, उद्योजक, व्यापारी यांचे आक्षेप नोंदविल्यानंतर 1 एप्रिलपासून नवी दरवाढ होण्याची शक्यता आहे. केईआरसीची बैठक गुरुवारी सकाळी 10.30 वाजता नवनगर हुबळी येथे हेस्कॉम कार्पोरेट कार्यालयात होणार आहे. पुढील आर्थिक वर्षात दरवाढ करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच हेस्कॉमने घरगुतीसह व्यावसायिक वीजबिल दरवाढ करण्याचा प्रस्ताव केईआरसीकडे दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दरवाढ होणार हे निश्चित आहे. राज्यात एक एप्रिलपासून दरवाढ केली जाते. सध्या गृहज्योती योजनेमुळे वीजबिलाची रक्कम कमी येत आहे. परंतु मर्यादेपेक्षा अधिक वापर झाल्यास पूर्ण बिल दिले जात आहे. सध्या उन्हाच्या झळा वाढल्या असल्याने विजेचा वापरही वाढला आहे. त्यामुळे बिलाचा आकडा दुप्पट झाल्याने नागरिक चिंतेत आहेत. असे असताना आता पुन्हा एकदा दरवाढ होणार असल्याने बिलामध्ये मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.









