वीज नियमन आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर
पणजी : राज्यातील जनता नाताळसण व नववर्ष स्वागताच्या जय्यत तयारीला लागली असतानाच आता सर्वसामान्य जनतेला वीज दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे. कारण वीज खात्याने संयुक्त वीज नियमन आयोगाकडे (जेईआरसी) वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय झाल्यानंतर येत्या नवीन वर्षातच वीज दरवाढीचा शॉक बसण्याची चिन्हे आहेत. वीज खात्याकडून सलग तिसऱ्या वर्षी हा वीज दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षांपासून वीज दरवाढ करण्यासंदर्भातील हा प्रस्ताव वीज खात्याने सादर केलेला आहे. या प्रस्तावावर याच आठवड्यात निर्णय झाल्यास नवीन वर्षात नागरिकांना वाढीव बिलाचा फटका बसणार आहे.
संयुक्त वीज नियमन आयोग (जेईआरसी) हे गोवा तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील वीज दरवाढीचा निर्णय घेत असते. वीज दरवाढ करायची झाल्यास वीज खात्याला त्यासंबंधीचा प्रस्ताव सर्वप्रथम या आयोगाकडे पाठवावा लागतो. त्यानंतर प्रस्तावित दरवाढीचा निर्णय आयोगाला घ्यावा लागतो. वीज खात्याने सलग तिसऱ्या वर्षी हा दरवाढीचा प्रस्ताव पाठवल्याने दरवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. वीज दरवाढ झाल्यास घरगुती व व्यावसायिक कमी दाबाच्या वीज ग्राहकांना या वाढीचा सामना करावा लागणार आहे. वीज नियमन आयोगाने 2023-24 या आर्थिक वर्षात 5.2 टक्के दरवाढीबाबात निर्णय घेतला होता आणि त्यानुसार वीज दरवाढ करण्यात आली होती. हॉटेल व्यवसाय, सार्वजनिक विद्युतीकरण, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन, कृषी विभाग, व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्र, साईनबोर्ड आदींसाठी प्रस्तावित वीज दरवाढीचा प्रस्ताव आहे. वीज खात्याने दाखल केलेल्या प्रस्तावानुसार वीज खात्याला येत्या 2024-2025 या आर्थिक वर्षात सुमारे 474.7 कोटी ऊपयांचा महसूल मिळणार आहे.