परिसरातील उद्योजक बनले चिंताग्रस्त : कामाचे तास कमी झाल्यामुळे कामगारांचा पगारही कमी
वार्ताहर /मच्छे
वीजदरात अवास्तव वाढ आणि औद्योगिक उत्पादनात होत असलेली घट, यामुळे बेळगाव परिसरातील उद्योजक चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून औद्योगिक उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यातच मे महिन्याच्या वीज बिलामध्ये भरमसाट वाढ केल्यामुळे याचा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मालाची मागणी अचानक कमी झाल्यामुळे 20 ते 30 टक्के उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे साहजिकच मोठ्या व लहान उत्पादकांवर याचा परिणाम झाला आहे. कामाचे तास कमी झाल्यामुळे कामगारांचा पगारही कमी झाला आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादक आणि कामगारांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. आगामी सहा महिन्यातही उत्पादन वाढीची कोणतीही चिन्हे दिसत नसल्यामुळे उत्पादक चिंतामग्न झाला आहे. कच्च्या मालाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मोठ्या उत्पादकांकडून सतत दर कमी करण्याचा लावलेला तगादा यामुळे सर्व समस्येच्या गर्तेत उत्पादक अडकला आहे. एप्रिलमध्ये पगारवाढ न दिल्यास कामगार इतरत्र जाण्याची शक्यता असते. सध्या कुशल कामगारांची कमतरता जाणवत आहे. फौंड्री उद्योगाला मोल्डर देखील मिळणे कठीण झाले आहे. मोल्डिंग करण्यासाठी सध्याची पिढी पुढे येत नाही. त्यातच हेस्कॉमने वीज बिलात मोठी वाढ केल्यामुळे खर्चाचा फार मोठा फटका बसला आहे.
किरकोळ उद्योजकांवर परिणाम
फौंड्री उद्योगांमध्ये सरासरी 50 टनाचे काम करणाऱ्या कंपनीला एक लाखाचे अधिक बिल आले आहे. त्यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे. उद्योग चालू ठेवावा का बंद, या विवंचनेमध्ये फौंड्री उद्योजक आहे. फौंड्री उद्योगावर इतर वीस ते पन्नास उद्योग अवलंबून असतात. त्यामुळे उत्पादनात घट झाल्यामुळे आणि वीजवाढ, कामगारांचा पगार या समस्यांमुळे लहान उद्योजकांवर परिणाम झाला आहे. काही लहान उद्योग बंद झाले आहेत. त्यामुळे सर्वांचेच आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तरी सरकारने वाढीव वीज बिलाबाबत योग्य निर्णय घेऊन वीज बिलदरात कपात करावी, अशी मागणी उत्पादकांतून होत आहे.
फौंड्री उद्योग अडचणीत
सध्या उत्पादन कमी झाले असून, त्यातच अवास्तव वीज दरवाढ यामुळे फौंड्री उद्योग अडचणीत सापडला आहे. वीज दरवाढ करताना सरकारने उद्योजकांचा विचार करावा व वीज दरवाढ मागे घ्यावी.
– प्रसाद हंगीरगेकर,उद्योजक, विनायक फौंड्री









