न्हावेली / वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावात अद्यापही विद्युत वाहिन्या, खांब धोकादायक स्थितीत आहेत. रात्री अपरात्री तसेच दिवसाढवळ्या कधीही दुरुस्तीच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित केला जातो. मात्र याकडे ऊर्जा मंत्र्यांसह अभियांत्यांचे लक्ष जात नाही. परंतु प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याकडे लक्ष जात आहे. प्रत्यक्षात सेवेचाच बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे हीच काय महावितरणची दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा, असा सवाल जिल्ह्यातील वीज ग्राहकांमधून केला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यात वीज सेवेचा बोजवारा उडालेला दिसून येतो. धोकादायक स्वरूपात वीजवाहिन्या, जीर्ण झालेले विद्युत खांब, झुडपाना लागणाऱ्या वाहिन्या, कलंडत असलेले विद्युत खांब आदी समस्यांच्या चक्रव्यूहात वीज ग्राहक सापडला आहे. मुळात ऊर्जा मंत्र्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी याकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक असताना दुर्लक्ष का होत आहे असा सवाल जिल्ह्यातील वीज ग्राहक करत आहेत.
जिल्ह्यात वेगवेगळ्या दिवशी दुरुस्तीच्या नावाखाली काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित केला जातो. सावंतवाडी तालुक्यातील आरोस मध्ये एक दुर्दैवी घटना घडल्यानंतर वीज वितरणच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी ताशेरे ओढले होते. वीज वितरण काय सेवा देते हे प्रत्यक्षात दाखवण्यासाठी वाहिन्यांचा तत्काळ सर्वे करूया असे सांगताच अधिकारी मात्र स्तब्ध राहिले. सरकार व प्रशासनास खरोखरच ग्राहकांना लोकाभिमुख सेवा पुरवायचे असेल तर मुळात विद्युत वाहिन्या व विद्युत खांब निर्धोक करा आणि मगच पुढचा विचार करा असे काही ग्राहकांनी बोलून दाखविले.
अधिकाऱ्यांवरच देखरेखीचे प्रीपेड मीटर बसवा
आरोस गावासारखी घटना घडल्यानंतर शेकडो वीज ग्राहकांच्या एकजुटीमुळे अभियंत्यांना सुद्धा घटनास्थळी यावे लागते. मुळात हेच अधिकारी, अभियंते जर सेवेच्या सर्वेक्षणासाठी बाहेर पडले तर वीज सेवा सुरळीत होण्याची थोडीशी आशा वाटते. त्यामुळे अशा अधिकारी तसेच अभियंत्यांवरच देखरेखीसाठी प्रीपेड वीज मीटर बसवा असे जिल्ह्यातील वीज ग्राहकांमधून बोलले जात आहे.









