व्यवसायाला फटका बसल्याने व्यापाऱ्यांमधून संताप : गणेशोत्सव तयारीलाही अडथळा
बेळगाव : ऐन बाजाराच्या दिवशी हेस्कॉमकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने व्यापारी तसेच ग्राहकांना जोरदार फटका बसला. आधीच मुसळधार पावसाने मागील आठवड्यात खरेदीसाठी वेळ दिला नाही. मिळालेल्या एका रविवारीही दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने गणेशोत्सवाच्या तयारीला ब्रेक लागला. यापूर्वी इतके दिवस दुरुस्तीचे काम सुरू असताना पुन्हा रविवारी वीजपुरवठा खंडित करण्याची गरज काय होती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रविवारी बेळगाव शहरासह तालुक्यातील अधिकतर गावांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. साप्ताहिक सुटी असल्याने सकाळपासूनच शहरातील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परंतु, वीजपुरवठा नसल्याने जनरेटर व इन्व्हर्टरच्या साहाय्याने दुकाने सुरू करावी लागली. काही काळानंतर इन्व्हर्टर बंद झाल्याने मोबाईलच्या प्रकाशात दुकाने चालविण्याची वेळ विक्रेत्यांवर आली. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरेदीसाठी अवघे तीन ते चार दिवस मिळाले होते. रविवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार खरेदीसाठी शहरात दाखल झाले होते.
सध्या अनेक व्यवसाय हे विजेवर अवलंबून असल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे बाजारपेठेत सर्वत्र जनरेटरची धडधड ऐकायला येत होती. मागील पंधरा दिवसांपासून हेस्कॉमकडून शहराच्या विविध भागात दुरुस्तीचे काम सुरू असताना शेवटच्या टप्प्यातच पुन्हा दुरुस्ती करण्याची गरज का निर्माण झाली? असा प्रश्न व्यापारीवर्गातून उपस्थित केला जात होता. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, विजेअभावी रविवारी दिवसभर त्यांचेही कोणतेच काम चालले नाही. तसेच घरांमध्ये सुरू असलेल्या डेकोरेशनच्या कामालाही फटका बसला. एकूणच गणेशभक्तांमधून हेस्कॉमच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीचा सूर दिसून आला.









