नागरिकांनी कामगारांना पैसे अथवा खुशाली देण्याची गरज नाही
बेळगाव : विद्युत बिलासाठी मीटर रिडींग घेताना अडथळे दूर व्हावेत, यासाठी शहरात स्टॅटेस्टीक मीटर हेस्कॉमतर्फे बसविले जात आहेत. मीटर बसविणे पूर्णपणे मोफत असतानाही मीटर बसविणारे खासगी कंपनीचे कंत्राटी कामगार नागरिकांकडून 100 ते 300 रुपये सक्तीने वसूल करीत आहेत. नागरिकांनी कामगारांना मीटर बसविल्यानंतर खुशाली अथवा कोणत्याही प्रकारे पैसे देऊ नयेत, असे आवाहन हेस्कॉमतर्फे करण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांपासून शहरातील जुने मीटर काढून त्याठिकाणी नवीन मीटर बसविले जात आहेत. मीटर बसविण्याचे कंत्राट बेंगळूर येथील कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे कंत्राटी कामगार घरोघरी जाऊन मीटर बसवत आहेत. मीटर बसविणाऱ्या कामगारांकडे पुरेशी माहिती नसल्याने अनेक अपार्टमेंटमध्ये वादावादीचे प्रकार घडले आहेत.
तसेच मीटर बसविल्यानंतर खुशालीच्या नावाखाली पैसे वसूल केले जात आहेत. मंगळवारी एसपीएम रोड, मंडोळी रोड या परिसरात मीटर बसविले जात होते. मीटर बसविल्यानंतर कामगारांनी नागरिकांकडून पैशांची मागणी केली. यामुळे काहीकाळ वादावादीचा प्रकार घडला. ग्राहकांना पुरेशी माहिती नसल्याने कामगार सांगतील तेवढी रक्कम त्यांना दिली जात आहे. गरज नसतानाही रक्कम दिली जात असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. काही ठिकाणी नागरिकच या कारभाराला जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. मीटर इतर ठिकाणी बसविण्यासाठी कामगारांना खुशाली दिली जात असल्याने असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.
पैशांची मागणी केल्यास हेस्कॉम कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा
हेस्कॉमकडून बसविण्यात येत असलेले विद्युत मीटर पूर्णपणे मोफत बसविले जात आहेत. कोणत्याही ग्राहकाने कामगारांना पैसे देऊ नयेत. पैशांची मागणी होत असेल तर तात्काळ हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
– ए. एम. शिंदे (प्रभारी कार्यकारी अभियंते)









