नव्या नियमामुळे घराचे स्वप्न पाहणाऱ्यांवर संकट : बेळगावसह हुबळी-धारवाड जिल्ह्यांमध्येही अंमलबजावणी
बेळगाव : यापुढे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ असेल तरच वीजमीटर दिले जाणार आहे. केईआरसीने नवीन नियमावली जाहीर केली असून याद्वारे एनओसी नसेल तर मीटर मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीला बेळगावमध्ये सोमवारपासून सुरुवात झाली. यामुळे एनओसी नसताना मीटर घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना माघारी धाडण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार यापुढे अनधिकृत इमारतींना वीजमीटर दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. यानुसार कर्नाटक इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन (केईआरसी)ने गुरुवार दि. 13 रोजी एका पत्रकाद्वारे वीजमीटरसाठी एनओसी आवश्यक आहे, असे कळविले आहे.
राज्यातील सर्व वीजग्राहकांना हा नवा निर्णय लागू करण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी अनधिकृत इमारती, तसेच घरांना वीजपुरवठा देण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. घराचे बांधकाम करण्यापूर्वी महानगरपालिका अथवा ग्राम पंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र, तसेच बिल्डींग प्लॅन व बिल्डअप एरिया या सर्वांची माहिती हेस्कॉमला दिल्यानंतर त्यांच्याकडून टेम्पररी वीजजोडणी दिली जाणार आहे. तर घराचे काम पूर्ण झाल्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट दिले जाते. हे प्रमाणपत्र हेस्कॉमला दिल्यानंतर कायमस्वरुपी मीटर दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमवारपासून अंमलबजावणीला सुरुवात
या नव्या नियमावलीच्या अंमलबजावणीला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. बाँड खरेदीद्वारे जमीन घेतलेले काही ग्राहक टेम्पररी मीटरसाठी हेस्कॉम कार्यालयात आले होते. त्यांना माघारी पाठविण्यात आले. त्यामुळे मीटर कसे मिळवायचे? असा प्रश्न आता त्या ग्राहकांसमोर आहे. बेळगाव परिसरात बाँडद्वारे मोठ्या प्रमाणात जमिनीचे खरेदी-विक्री प्रकार झाले असल्याने याचा फटका बसणार आहे. बेळगावसह हुबळी-धारवाड जिल्ह्यांमध्येही अंमलबजावणीला सोमवारपासून सुरुवात झाली.
बाँडवर प्लॉट खरेदी केलेल्यांना बसणार फटका
शहर व परिसरात शंभर ते पाचशे रुपयांच्या बाँडवर (मुद्रांक) जमीन खरेदी करण्यात आली आहे. विशेषत: अमननगर, न्यू गांधीनगर, श्रीनगर, समर्थनगर, वडगाव, अनगोळ, जुने बेळगाव या परिसरात बाँड खरेदीद्वारे प्लॉट खरेदी करण्यात आले आहेत. बाँड खरेदी असेल तर महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे बाँड खरेदीद्वारे प्लॉट घेतलेल्यांना फटका बसणार आहे.









