वीजबिलांतून वसूल करणार स्मार्ट मीटरचा खर्च
प्रतिनिधी /पणजी
स्मार्ट मीटरच्या नावाखाली नवीन मीटर वीज ग्राहकांच्या माथी मारले जाणार असल्याचे दिसत असून त्याचा खर्च वीजबीलातून वसूल करण्यात येणार असल्यामुळे आधीच दरवाढीने पोळलेल्या ग्राहकांना पुन्हा एकदा दरवाढीचा फटका बसणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून वीज ग्राहकांना वाढत्या वीजबिलांचा भूर्दंड बसत असून त्यात आता स्मार्ट मीटरमुळे पुन्हा एकदा वाढ होण्याची लक्षणे आहेत. वीज खात्याने अलिकडेच विविध कारणे सांगून वीज दरवाढीचा सपाटाच लावला आहे. त्यामुळे वीजबिलांची रक्कम वाढत असून ग्राहक हतबल होत असल्याचे चित्र आहे.
अलिकडेच वीजदरात 5 टक्के दरवाढ करण्यात आली आणि दरवर्षी ती 5 टक्के वाढणार असेही सूचित करण्यात आल्याने ग्राहक वैतागले आहेत. रस्त्यावरील वीज दिव्यांचा खर्चही आता ग्राहकांच्या बीलातून होणार आहे. हे सर्व झाल्यानंतर स्मार्ट मीटरचा खर्च बिलातून टप्प्याटप्प्याने वसूल करण्याचे वीज खात्याने ठरविले आहे. त्यामुळे वीजबिले पुन्हा वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अलिकडच्या काळात वीजबिलांच्या दरवाढीला काही मर्यादाच राहिली नसल्याचे दिसून येत आहे. बिलातील कर वाढत असून त्याचा परिणाम म्हणून बीले वाढत असल्याचे समोर येत आहे.









