अगसगे येथील हेस्कॉम कर्मचाऱयाची मनमानी : गलथान कारभारामुळे ग्राहक न्यायालयात दाद मागणार
वार्ताहर /अगसगे
हेस्कॉमचे बिल भरूनदेखील विद्युत पुरवठा बंद केल्याचा निंदनिय प्रकार सोमवारी अगसगे येथे घडला आहे. यामुळे हेस्कॉमचा गलथान कारभार चव्हाटय़ावर आला आहे. बेजबाबदार अधिकाऱयाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून याबद्दल ग्राहक न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागामध्ये एकतर सुरळीत वीजपुरवठा नसतो. वायरमन (लाईनमन) आणि वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभार चालवित आहेत. घरचे विद्युत बिल भरण्याची तारीख संपताच पक्कड घेऊन येऊन खांबावरील वायर कट करून विद्युत पुरवठा बंद करण्यात येतो. काहींचे बिल भरले तरी त्यांना दमदाटी करण्यात येते. असाच प्रकार सोमवार दि. 30 रोजी घडला आहे. सिद्राय केंचाप्पा गडकरी यांनी आपल्या घराचे एप्रिल महिन्याचे वीजबिल ऑनलाईन (मोबाईलवरून)द्वारे दि. 17 मे रोजी 193/-रुपये भरले आहेत. घरचा विद्युत पुरवठा कट करण्यासाठी आलेल्या लाईनमन आणि काकती विभाग अधिकाऱयांना ऑनलाईन फोन पे केलेली मोबाईलची प्रत दाखवली. तरी तुम्ही अद्याप बिल भरले नाही. फोन पेची खोटी प्रत दाखवत आहात म्हणून घरचा विद्युत पुरवठा बंद केल्याने अंधारातच राहण्याची वेळ गडकरी कुटुंबीयावर आली. यामुळे हेस्कॉमचा गलथान कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
हुबळी मुख्य अधिकाऱयाकडे तक्रार
हेस्कॉमच्या या अनागोंदी कारभाराबद्दल सिद्राय गडकरी यांनी हुबळी मुख्य कार्यालयामध्ये संबंधित काकती विभागीय अधिकाऱयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. याची दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश बेळगाव नेहरूनगर येथील हेस्कॉम खात्याचे ए. ई. ई. प्रशांत टोपगी यांना बजावला आहे. याबाबत बुधवार दि. 1 जून रोजी कार्यालयात चौकशीसाठी तक्रारदार आणि काकती विभाग अधिकाऱयाला बोलावण्यात आले आहे.
तिसऱया व्यक्तीमुळे ग्रामस्थांना त्रास
गावामध्ये वायरमन आहे. मात्र गावातीलच एक व्यक्ती सदर वायरमनकडे कामाला आहे. बेकायदेशीररित्या वायरमनने त्याला आपले काम करण्यासाठी ठेवून घेतले आहे. परंतू तो जणू काही स्वतःच हेस्कॉम अधिकारी असल्यासारखे वागतो. ग्रामस्थांशी उद्धट वागतो. या व्यक्तीविषयी अनेकवेळा हेस्कॉम अधिकाऱयांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे त्याच्यावर आणि वायरमनवर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सिद्राय गडकरी यांनी हेस्कॉम विरोधात ग्राहक न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले.









