सरासरीपेक्षा 10 लाख अधिकची पावती : गोंधळ मिटल्यानंतरच वीजबिल भरण्याचा व्हीटीयूचा निर्णय
वार्ताहर /मच्छे
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) ला हेस्कॉमने वाढीव वीजबिलाचा शॉक दिला. व्हीटीयूला तब्बल 35 लाख 5 हजार 869 रुपये बिल देण्यात आले. बेळगावमधील कॅम्पसबरोबरच दांडेली येथील नॅशनल अकॅडमी स्कील डेव्हलपमेंट सेंटर यासह मुद्देहळ्ळी येथील कॅम्पसचे मिळून भरमसाट बिल दिल्याने व्हीटीयू प्रशासनाचे डोळे पांढरे झाले आहेत. राज्यभरातील महाविद्यालयांना व्हीटीयूमार्फत तांत्रिक शिक्षण दिले जाते. बेळगावसह इतर दोन ठिकाणी व्हीटीयूचे कॅम्पस आहेत. गोवा रोड, बेळगाव बरोबरच मुद्देहळ्ळी व दांडेली येथील कॅम्पसमध्ये संशोधन केंद्र याबरोबरच इतर टेक्निकल लॅब आहेत. व्हीटीयूचे मे महिन्याचे विद्युत बिल तब्बल 35 लाख रुपये आले. मागील दोन महिन्यांची सरासरी पाहता 10 लाख रुपये बिल अधिक आल्याचे व्हीटीयूने म्हटले आहे. व्हीटीयूची नाराजी बेळगाव येथील मुख्य कॅम्पसचे बिल यावेळी 18 लाख 47 हजार 374 रुपये आले आहे. एप्रिलमध्ये हेच विद्युत बिल 13 लाख 27 हजार 657 रुपये आले होते. याचबरोबर म्हैसूर, कलबुर्गी, मुद्देहळ्ळी येथील विद्युत बिलातही भरमसाट वाढ झाल्याने व्हीटीयू प्रशासनाने नाराजी व्यक्त केली.
10 लाख रुपये जादा बिल
व्हीटीयूचे कुलपती प्रा. विद्याशंकर यांनी हेस्कॉमच्या या कारभारामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटक वीज नियामक आयोगाने वीज दरात केलेल्या वाढीमुळे व्हीटीयूला 10 लाख रुपये जादा बिल आले आहे. व्हीटीयूच्या मुख्य कॅम्पससह सर्व विभागीय केंद्रासाठी मे महिन्याचे एकूण 35 लाख 5 हजार 869 रुपये वीजबिल आले आहे. हेच बिल मार्चमध्ये 25,56,928 रुपये, एप्रिलमध्ये 25,29,021 रुपये बिल आले आहे. यावेळी व्हीटीयुला 10 लाख रुपये जादा वीजबिल आल्याने व्हीटीयू प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
गोंधळ मिटल्यानंतरच बिल भरण्याचा व्हीटीयुचा निर्णय
दरम्यान, वीज दरवाढीची ही समस्या न परवडणारी असल्याने औद्योगिक कंपन्यांनी राज्यभर विरोध केला आहे. यासाठी दि. 22 रोजी कर्नाटक बंदची हाक देण्यात आली आहे. व्हीटीयूने जादाचे 10 लाख रुपये वीजबिल आल्याने हे वीजबिल परत मिळविण्यासाठी हेस्कॉमला पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा गोंधळ मिटल्यानंतरच वीजबिल भरण्याचा निर्णय व्हीटीयुने घेतला आहे.









