हेस्कॉमकडून वसुलीसाठी तगादा : नवीन सीईओ आल्यावर घेणार निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात पथदीप व पाणीपुरवठ्यासाठी हेस्कॉमकडून वीजपुरवठा घेतला जातो. परंतु, मागील अनेक वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डने वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे हे बिल आता 1 कोटी 61 लाख रुपयांपर्यंत पोहोचले असून हेस्कॉमने शनिवारी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन बिल भरण्याचे आवाहन केले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डला निधी मंजूर होत नसल्याचे कारण देत मागील अनेक वर्षांपासून हेस्कॉमचे बिल थकविण्यात आले आहे. हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंते, कार्यकारी अभियंते, मुख्य अभियंत्यांनी अनेकवेळा पत्र लिहूनदेखील कॅन्टोन्मेंट बोर्डने बिल भरण्याकडे दुर्लक्ष केले. हेस्कॉमच्या एमडी डी. भारती यांनी देखील कॅन्टोन्मेंटच्या सदस्यांना बिल भरण्यासंदर्भात विनंती केली होती.
मागील चार-पाच वर्षांपासून बिल थकले असल्याने अखेर दोन महिन्यांपूर्वी हेस्कॉमने कॅन्टोन्मेंट बोर्डमधील पथदीपांसाठी पुरविला जाणारा वीजपुरवठा बंद केला. यामुळे खडबडून जागे झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱ्यांनी काही रक्कम हेस्कॉमच्या खात्यात जमा केली. परंतु, अद्याप 1 कोटी 61 लाख रुपयांचे बिल थकीत असून लवकरच भरावे, यासाठी शनिवारी कार्यकारी अभियंते ए. एम. शिंदे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी केली.
मंगळवारपर्यंत वीजबिल जमा करण्याचे आश्वासन
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱ्यांनी अनेकवेळा पत्र पाठवूनदेखील त्यांनी बिल भरलेले नाही. सध्या 1 कोटी 61 लाख रुपयांचे बिल थकीत असून बिल लवकरात लवकर भरावे, यासाठी शनिवारी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नूतन सीईओ सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याने मंगळवारपर्यंत वीजबिल जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
ए. एम. शिंदे (प्रभारी कार्यकारी अभियंते, हेस्कॉम)









