मर्सिडीज-बेंझ यांचा दावा ः 4 महिन्यात 3 इलेक्ट्रिक वाहने आणणार
मुंबई
जर्मन लक्झरी कार कंपनी मर्सिडीज-बेंझने येत्या पाच वर्षांत भारतातील एकूण वाहन विक्रीपैकी 25 टक्के वाटा इलेक्ट्रिक वाहनांचा असेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने बुधवारी ही माहिती दिली.

कंपनीची भारतीय शाखा मर्सिडीज-बेंझ इंडिया देशातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाला गती देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून पुढील चार महिन्यांत तीन ईव्ही लाँच करणार आहे. या योजनेअंतर्गत, कंपनीने संपूर्ण इलेक्ट्रिक कार मर्सिडीज-एएमजी ईक्यूएस 53 4 एमएटीआयसी सादर केली आहे. याची एक्स शोरुम किमत ही जवळपास 2.45 कोटी रुपयांपासून सुरू होत असल्याची माहिती आहे.
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मार्टिन श्वेंक यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षांमध्ये आमच्या एकूण विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 25 टक्के इतका असेल. याबाबत आम्ही अत्यंत आशावादी आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
कंपनीने 2021 मध्ये एकूण 11,242 युनिट्सची विक्री केली होती. तर 2022 मध्ये कंपनीने आतापर्यंत 7,573 युनिट्सची विक्री केली आहे. श्वेंक म्हणाले की कंपनीच्या एकूण विक्रीतील इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा सध्या सिंगल डिजिटमध्ये आहे परंतु नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स पूर्णपणे उपलब्ध झाल्यावर पुढील वर्षापासून वाटा हा वाढणार असल्याचा दावाही केला आहे.









