प्राणी संग्रहालयात व्यवस्था, वयोवृद्ध पर्यटकांची गैरसोय दूर
बेळगाव : शहरापासून अवघ्या 12 कि. मी. अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात इलेक्ट्रिक व्हॅन दाखल झाल्या आहेत. त्यामुळे संग्रहालयात येणाऱ्या वयोवृद्ध आणि बालकांची गैरसोय दूर झाली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून पर्यटकांना संग्रहालयाचा आनंद लुटता येणार आहे. म्हैसूर प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाचा विकास साधला जात आहे. तब्बल 39 हेक्टरात पसरलेल्या या प्राणी संग्रहालयात विविध प्राणी आणि पक्षी दाखल झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. विशेषत: सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे सुटीदिवशी उत्पन्न दीड लाखापर्यंत जाऊ लागले आहे. प्राणी संग्रहालयात वयोवृद्ध पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. वाहनाअभावी पर्यटकांची गैरसोय होत होती. विशेषत: वयोवृद्ध आणि बालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन व्यवस्थापनाने संग्रहालयात फिरण्यासाठी दोन इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था केली आहे. यापैकी एक वाहन दाखल झाले आहे तर दुसरे वाहन येत्या चार दिवसात दाखल होणार आहे. त्यामुळे संग्रहालयात येणाऱ्या आबालवृद्धांची गैरसोय दूर झाली आहे.
प्राणी संग्रहालयात सिंह, वाघ, कोल्हे, मोर, मगर, बिबटे, हरिण, सांबर, चितळ, अस्वल यासह विविध दुर्मिळ पक्षी आणण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि स्थानिक पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. यामध्ये वयोवृद्ध व बालकांची संख्या मोठी आहे. यांची गैरसोय दूर करण्यासाठी व्यवस्थापनाने दोन इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आता वयोवृद्धांना वाहनाच्या माध्यमातून प्राणी संग्रहालयाचे दर्शन घेता येणार आहे. शासनाने महिलांसाठी मोफत बसप्रवास सुरू केल्याने भुतरामहट्टीत प्राणी संग्रहालयात महिला पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे संग्रहालयाचा महसुलही वाढत आहे. त्यामुळे महिलांच्या मोफत प्रवाशांची योजना संग्रहालयाच्या पथ्यावर पडली आहे. संग्रहालय मंगळवार वगळता इतर दिवशी सकाळी 9.30 ते सायं. 5.30 या वेळेत खुले ठेवण्यात येत आहे. शासकीय सुटीच्या दिवशीदेखील संग्रहालय खुले राहत आहे.
पर्यटकांनादेखील व्हॅनद्वारे संग्रहालयाचा आनंद लुटता येईल
वयोवृद्ध पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी संग्रहालयात दोन इलेक्ट्रिक व्हॅन आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण संग्रहालयाचा परिसर या माध्यमातून फिरता येतो. दिव्यांग आणि लहान बालकांचीदेखील सोय होणार आहे. शिवाय इतर पर्यटकांनादेखील या व्हॅनद्वारे संग्रहालयाचा आनंद लुटता येणार आहे.
– के. एन. वेण्णूर (भुतरामहट्टी आरएफओ)









