अटकेतील चौकडीकडून 14 विद्युत मोटारींसह दोन दुचाकी जप्त
बेळगाव : गोकाक तालुक्यातील वेगवेगळ्या गावात विहिरी व कूपनलिकांवर बसविण्यात आलेल्या विद्युत मोटारी चोरणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला कुलगोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या 14 विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. कुमार रमेश कंबार (वय 21), यल्लाप्पा मुदकाप्पा नंदी (वय 35), रवी अजित कंबार (वय 21), भीमाप्पा होळेप्पा हणमसागर (वय 37) चौघेही राहणार कैतनाळ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या चौकडीने बारा गावात चोरलेल्या 14 विद्युत मोटारी, दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. 9 ऑगस्ट 2023 रोजी मल्लाप्पा यमनाप्पा लाडी, रा. हडगीनहाळ यांच्या शेतजमिनीतील कूपनलिकेला बसविण्यात आलेली 2 एचपीची विद्युत मोटार चोरण्यात आली होती. या प्रकरणी कुलगोड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
विद्युत मोटारी जप्त
कुलगोड पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक जी. एस. पाटील व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी चौघा जणांना अटक करून त्यांनी सज्जीहाळ, व•sरहट्टी, खणगाव, तवग, बेनचिनमर्डी, गिळीहोसूर, कैतनाळ, केशप्पनहट्टी कॅनाल, बेळवंकी, हडगीनहाळ, कोळवी कॅनॉल, मिडकनट्टी परिसरात चोरलेल्या विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.









