कळंबा :
कळंबा–गोरगोटी मार्गावरील कळंबा येथील कळंबा गर्ल्स हायस्कूल शेजारी असलेला महावितरणचा विजेचा खांब सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत उभा आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा खांब पूर्णपणे गटारीच्यामध्ये पाण्यात उभा असून, पोल संपूर्णपणे गटारीतील पाण्यात बुडालेला आहे. सतत वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे खांबाचा खालचा भाग पूर्णपणे गंजला आहे. कधी कोसळेल याची खात्री नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कळंबा गर्ल्स हायस्कूल या खांबापासून काही फुटांवर आहे. लवकरच शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या खांबावर अनेक घरगुती वीज कनेक्शन जोडलेले असून, त्याच्या निकृष्ट अवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी केल्या, पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या धोकादायक पोलमुळे एखादी गंभीर घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. खांब पूर्णत: गंजलेला असून, तो तातडीने बदलण्याची गरज आहे. नागरिकांनी हा खांब काढून नवीन मजबूत खांब बसवण्याची मागणी केली आहे.








