हेस्कॉम कर्मचाऱ्यांचे दिवे बंद करण्याकडे दुर्लक्ष
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
शहरी भागामध्ये भरदिवसाही रस्त्यावरील विद्युत खांबावरील दिवे सुरू राहण्याच्या घटना सुरूच असतात. परंतु आता ग्रामीण भागातही रस्त्यावरील खांबावरील विद्युत दिवे भरदिवसाही सलग पूर्ण दिवस सुरू राहत आहेत. कंग्राळी बुद्रुक येथील लक्ष्मी गल्लीमधील विद्युत दिवे तर मंगळवारी पूर्ण दिवस सुरूच होते. यामुळे आता हेस्कॉम खात्याला दिवसाही रात्र दिसू लागली आहे का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहेत. तसेच अशा बेजबाबदार हेस्कॉम कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात येत आहे. लक्ष्मी गल्लीतील दिवे मंगळवारी पूर्ण दिवस सुरूच राहिल्यामुळे गरज नसताना विजेची नासाडी होत आहे. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी राहणार आहे. वीज ही पाण्यावर तयार करण्यात येते याचे भान हेस्कॉम अधिकाऱ्यांना राहणे गरजेचे आहे. मध्यंतरी सलग दोन दिवस दिवे सुरूच होते. नागरिकांनाच हा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. तेव्हा अशा बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून ही भरपाई वसूल करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.









