43 मोटारी हस्तगत; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
प्रतिनिधी/ कराड
कराड तालुक्यात विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. या टोळीकडून चोरीच्या तब्बल 43 इलेक्ट्रिक मोटारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. 2 लाख 36 हजारांच्या मोटारी चोरल्याप्रकरणी सातजणांच्या टोळीस पकडण्याच यश आले.
अभय जनार्दन चव्हाण, आप्पा रघुनाथ सातपुते, गणेश बाळासो कांबळे, गणेश महेंद्र चव्हाण (सर्व रा. पेरले, ता. कराड), शुभम कालिदास जेटीथोर, साहिल कालिदास जेटीथोर, कपिल सत्यवान जेटीथोर (सर्व रा. कालगाव, ता. कराड) अशी टोळीतील संशयितांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील पेरले, कालगावसह अनेक गावात विहिरीवरील मोटारी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पेरले येथील संशयितांनी टोळी तयार करून मोटारी चोरण्याचा सपाटा लावल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे अरूण देवकर यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, अमित पाटील यांच्या पथकाने टोळीला पकडण्यासाठी सापळा रचला होता. कराड तालुक्यात पोलिसांनी संशयितांना पकडण्यासाठी त्यांच्या हालचालीवर नजर ठेवली होती. दरम्यान संशयितांना पकडून त्यांच्याकडे चौकशी केल्यावर 43 चोरीच्या मोटारी हस्तगत केल्याची कबुली दिली. चोरटय़ांनी कराड तालुक्यातील पेरले, कालगाव, भुयाचीवाडी, खराडे, उंब्रज, औंध, बोरगाव, तळबीड या भागातील मोटारी चोरी केल्याची कबुली दिली. 2 लाख 36 हजारांच्या मोटारी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस निरीक्षक अरूण देवकर, रमेश गर्जे, अमित पाटील, संतोष तासगावकर, संतोष पवार यांनी कारवाईत सहभागी पोलीस पथकाचे अभिनंदन केले.









