जैस्वाल, सामनावीर पडिक्कल यांची अर्धशतके, हेटमेयरच्या जलद 46 धावा, नवदीप सैनीचे 3 बळी
वृत्तसंस्था/ धरमशाला
शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या 2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात जैस्वाल आणि पडीक्कल यांची अर्धशतके तसेच हेटमेयरच्या समयोचित फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा 2 चेंडू बाकी ठेऊन 4 गड्यांनी पराभव करत आपली वाटचाल प्लेऑफ फेरीकडे केली आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात राजस्थान रॉयल्सने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर पंजाबचा संघ शेवटून तिसऱ्या स्थानावर आहे.

पंजाब किंग्जने यजमान राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 188 धावांचे कडवे आव्हान दिले. या स्पर्धेतील 66 व्या सामन्यात पंजाब किंग्जने 20 षटकात 5 बाद 187 धावा जमविल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 19.4 षटकात 6 बाद 189 धावा जमवित आपला विजय नोंदविला.
राजस्थान रॉयल्स संघातर्पे सलामीच्या यशस्वी जैस्वालने देवदत पडीक्कलसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी बटलर डावातील दुसऱ्या षटकात खाते उघडण्यापूर्वीच पायचीत झाला होता. जैस्वालने 36 चेंडूत 8 चौकारासह 50 तर पडीक्कलने 30 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 51 धावा जमविल्या. पडीक्कल 10 व्या षटकात बाद झाला. त्यानंतर कर्णधार सॅमसन केवळ 2 धावा जमवित तंबूत परतला. जैस्वाल इलिसच्या गोलंदाजीवर 15 व्या षटकात झेलबाद झाला.

हेटमेयर आणि पराग यांनी आपल्या संघाला विजयाच्या समीप नेताना 5 व्या गड्यासाठी 32 धावांची भर घातली. परागने 12 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा जमविल्या. रबाडाने त्याला 18 व्या षटकात झेलबाद केले. करनच्या गोलंदाजीवर कर्णधार धवनने हेटमेयरचा जमिनीलगत अप्रतिम झेल टिपला. हेटमेयरने 28 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 46 धावा जमविल्या. हेटमेयर 19 व्या षटकातील 5 व्या चेंडूवर बाद झाला. राजस्थानला शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 9 धावांची गरज होती. हे शेवटचे शतक राहुल चहरने टाकले. या षटकातील पहिल्या चेंडूवर जुरेलने 2 धावा घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर जुरेलने आणखी एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर बोल्टने एकेरी धाव मिळविली. जुरेलने चौथ्या चेंडूवर उत्तुंग विजयी षटकार खेचत पंजाबचे आव्हान संपुष्टात आणले. राजस्थानच्या डावामध्ये 9 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. राजस्थानने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 57 धावा घेताना 1 गडी गमाविला. राजस्थानचे अर्धशतक 33 चेंडूत, शतक 72 चेंडूत, दीडशतक 97 चेंडूत नोंदविले गेले. राजस्थानला अवांतराच्या रुपात 9 धावा मिळाल्या. पंजाबतर्फे रबाडाने 2 तर सॅम करन, अर्शदीप सिंग, इलिस आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
पंजाबची खराब सुरुवात
या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. पहिल्या षटकापासूनच त्यांच्या डावाला गळती सुरु झाली. त्यांचे पहिले 4 फलंदाज 50 धावांच्या मोबदल्यात 6.3 षटकात तंबूत परतले होते. डावातील पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर राजस्थानच्या बोल्टने स्वत:च्याच गोलंदाजीवर प्रभसिमरन सिंगला 2 धावावर टिपले. त्यानंतर चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर सैनीने अथर्व तायडेला पडीक्कलकरवी झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 19 धावा जमविताना कर्णधार धवनसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 20 चेंडूत 35 धावांची भागिदारी केली. फिरकी गोलंदाज झाम्पाने कर्णधार धवनला पायचीत केले. त्याने 12 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. सैनीने लिव्हिंगस्टोनचा त्रिफळा उडविला. त्याने 13 चेंडूत 1 चौकारासह 9 धावा जमविल्या. पंजाबने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 48 धावा जमविताना 3 गडी गमाविले. पंजाबचे अर्धशतक 38 चेंडूत तर शतक 79 चेंडूत फलकावर लागले.
सॅम करन आणि जितेश शर्मा या जोडीने पाचव्या गड्यासाठी 44 चेंडूत 64 धावांची भागिदारी केली. करन आणि शर्मा यांनी अर्धशतकी भागिदारी 39 चेंडूत नोंदविली. डावातील 14 व्या षटकात सैनीने जितेश शर्माला झेलबाद केले. त्याने 28 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 44 धावा जमविल्या. पंजाबच्या 150 धावा 111 चेंडूत नोंदविल्या गेल्या. सॅम करन आणि शाहरुख खान यांनी शेवटच्या 2 षटकामध्ये आक्रमक फटकेबाजी केल्याने पंजाबला 187 धावांपर्यंत मजल मारता आली. या जोडीने 6 व्या गड्यासाठी केवळ 37 चेंडूत अभेद्य 73 धावांची भागीदारी केली. त्यांची अर्धशतकी भागिदारी 30 चेंडूत नोंदविली. सॅम करनने 31 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 49 तर शाहरुख खानने 23 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 41 धावा तडकावल्या. पंजाबने शेवटच्या 5 षटकात 70 धावा झोडपल्या. पंजाबच्या डावामध्ये 9 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. त्यांना अवांतराच्या रुपात 6 धावा मिळाल्या. राजस्थान रॉयल्सतर्फे नवदीप सैनी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 40 धावात 3 तर बोल्ट आणि झाम्पा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – पंजाब किंग्ज : 20 षटकात 5 बाद 187 (प्रभसिमरन सिंग 2, धवन 12 चेंडूत 17, तायडे 12 चेंडूत 19, लिव्हिंगस्टोन 13 चेंडूत 9, सॅम करन 31 चेंडूत नाबाद 49, जितेश शर्मा 28 चेंडूत 44, शाहरुख खान 23 चेंडूत नाबाद 41, अवांतर 6, नवदीप सैनी 3-40, बोल्ट 1-35, झाम्पा 1-26).
राजस्थान रॉयल्स : 19.4 षटकात 6 बाद 189 (जैस्वाल 36 चेंडूत 50, बटलर 0, पडीक्कल 30 चेंडूत 51, सॅमसन 2, हेटमेयर 28 चेंडूत 46, रियान पराग 12 चेंडूत 20, जुरेल 4 चेंडूत नाबाद 10, बोल्ट नाबाद 1, अवांतर 9, रबाडा 2-40, करन 1-46, अर्षदीप सिंग 1-40, इलिस 1-34, राहुल चहर 1-28).








