भाजपकडून तयारीला प्रारंभ ः काँग्रेसला ‘भारत जोडो’मुळे लाभ होण्याची अपेक्षा
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीची चाहुल लागल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. मे महिन्यापूर्वीच या केंद्रशासित प्रदेशात निवडणूक होणार असल्याचे समजते. भाजप महासचिव बी.एल. संतोष यांनी अलिकडेच एक महत्त्वाची बैठक घेत पक्ष कार्यकर्त्यांना सक्रीय होण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप आणि जम्मू-काश्मीर अपनी पार्टीचे अध्यक्ष अल्ताफ बुखारी यांच्यातील जवळीक वाढल्याने आणि आघाडी होण्याची शक्यता पाहता काश्मीर खोऱयात नवी समीकरणे तयार होऊ शकतात. भाजपच्या हालचाली पाहता अन्य पक्ष देखील तयारीला लागले आहेत.
नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेसकडून विधानसभा मतदारसंघांमध्ये फैलावलेल्या स्वतःच्या नेत्यांना सक्रीय केले जात आहे. निवडणुकीची चाहुल लागल्यावरही केंद्रशासित प्रदेशात आघाडीच्या राजकारणाचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्यात गुपकार आघाडीच्या अंतर्गत निवडणूक लढविण्याबद्दल दोन्ही पक्षांचे नेते टिप्पणी करणे टाळत आहेत.

मेहबूबा यांचे जम्मूवर लक्ष
माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती मागील काही काळापासून छोटय़ा छोटय़ा सभा घेत आहेत. तसेच त्यांच्या भूमिकेत मोठा बदल दिसून येत आहे. मेहबूबा मुफ्ती सध्या भाजपवर जम्मूची उपेक्षा करण्याचा आरोप करत आहेत. जम्मू क्षेत्रातील पीडीपीसाठीचे समर्थन वाढविण्याचा त्यांचा हेतू आहे.

काँग्रेसला पाठिंब्याची आस
भारत जोडो यात्रा केंद्रशासित प्रदेशात पोहोचणार असल्याने आणि गुलाम नबी आझाद यांचे अनेक समर्थक पक्षात परतल्याने काँग्रेसमध्ये उत्साह आहे. 20 जानेवारी रोजी केंद्रशासित प्रदेशात भारत जोडो यात्रा दाखल होणार असल्याने पक्षाचे बळ वाढणार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष रसूल वानी यांनी केला आहे.

बहिष्कारास नकार
निवडणुकांच्या संभाव्य घोषणेला नॅशनल कॉन्फरन्स जनतेचा अधिकार संबोधित आहे. निवडणुकीची घोषणा ही भाजकडून जनतेला दिलेली भेट नव्हे असे पक्षाचे म्हणणे आहे. ओमर अब्दुल्ला यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली असली तरीही गुपकार आघाडीसंबंधीची भूमिका स्पष्ट केलेली नाही.
पक्षांतरामुळे आझाद त्रस्त
माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रेटिक आझाद पक्षाचा उत्साह मावळल्याचे चित्र आहे. पक्षनेतृत्व पक्षांतराच्या समस्येला तोंड देत आहे. सर्व क्षेत्रांमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी देखील झालेली नाही. पक्षाने अद्याप निवडणूक रणनीतिचीही घोषणा केलेली नाही.
जम्मूमध्ये ‘आप’ सक्रीय
आम आदमी पक्ष पंजाबमधील यशाची जम्मूमध्ये पुनरावृत्ती करणार असल्याचे सांगत आहे. पंजाबमधील यशाचा प्रभाव जम्मूमध्येही पडणार असल्याची अपेक्षा आम आदमी पक्षाला आहे. पक्षनेते नजीर यतू यांनी लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.









