ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईतील धनसंपत्ती हाती घेण्यासाठी शिवसेना फोडण्यात आली. भाजपला शिवसेना फोडायची होती, त्यांनी फोडून दाखवली. त्यानंतर फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद देण्यात आले. पण ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील. गुजरातसोबत महाराष्ट्राचीही निवडणूक होऊ शकते, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
दिल्लीत आज सकाळी राऊत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य कशी काय केली जाऊ शकते. देशाच्या जनतेला यातून काय मिळणार आहे?, मूळ सत्तेतून फुटलेला गट शिवसेना कशीअसू शकते, हे बंडखोरांनी सांगावे. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या फुटीर गटाला मान्यता देण्यात आली. वेळेनुसार मालक बदलला की निर्णय बदलले जात आहेत.
39 आमदारांचा गट फुटल्याने शिवसेना कमजोर झाली, असं म्हणणे म्हणजे बाळासाहेबांचा अपमान आहे. हे सहन करणार नाही. सुरुवातीला शिवसेनेला डावललं गेल आताही तो प्रयत्न होत आहे. यावरुन कळतं की, मुंबईतून सेनेला वेगळ करायचं आहे. मध्यावधी निवडणुकांच्या पवारांनी केलेल्या वक्तव्याचा पाठवपुरावा करत गुजरातसोबतच महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ शकतात, असेही राऊत म्हणाले.








