अंतरिम सरकारकडून तयारी सुरू : कायदाविषयक सल्लागार
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2026 मध्ये होणार असून अंतरिम सरकारने याकरता तयारी सुरु केली आहे. सरकार फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणूक करविण्याच्या प्रतिबद्धतेवर ठाम आहे. सरकार निवडणुकीसाठी तयारी करत आहे. निवडणूक फेब्रुवारीत होईल आणि यावर सरकारची भूमिका अटळ असल्याचा दावा अंतरिम सरकारचे कायदाषियक सल्लागार आसिफ नजरुल यांनी केला आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या कालावधीविषयी वक्तव्यं करणे राजकीय प्रक्रियेचा हिस्सा आहे. बांगलादेशात पांरपरिक स्वरुपात अशाप्रकारची राजकीय वक्तव्यं केली जात राहिली असून आताही हेच घडत आहे. या स्थितीत कोणतेही मोठे गुणात्मक परिवर्तन घडलेले नाही. याचमुळे निवडणुकीच्या कालावधीविषयी जे काही बोलले जाते त्याला राजकीय प्रकियेच्या हिस्स्याच्या स्वरुपात पाहिले जावे असे आसिफ नजरुल यांनी म्हटले आहे.
निवडणूक करविण्याची जबाबदारी सरकारची आहे, कुठल्याही राजकीय पक्षाची नाही. निवडणूक फेब्रुवारीत पूर्ण होईल असे सरकारच्या वतीने आम्ही स्पष्ट करत आहोत. मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस हे जागतिक स्तरावर सन्माननीय व्यक्ती असून ते प्रतिबद्धतेपासून भटकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण निवडणूक घोषित कार्यक्रमानुसारच होईल असे नजरुल यांनी म्हटले आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारीत निवडणूक महत्त्वपूर्ण सुधारणा आणि अंतरिम सरकारकडून सुरू करण्यात आलेले खटले पूर्ण झाल्याशिवाय होऊ शकत नसल्याचा दावा नॅशनल सिटीजन पार्टीने केला होता. या पार्श्वभूमीवर नजरुल यांना सरकारची भूमिका स्पष्ट करावी लागली आहे.
जुलै 2024मध्ये झालेल्या बंडानंतर शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. या बंडात मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यामुळे शेख हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला होता. यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन अंतरिम सरकारने देशात लोकशाहीवादी वातावरण तयार करण्याचे आश्वासन दिले होते. मागील अनेक महिन्यांपासून बांगलादेशात राजकीय पक्ष नव्याने सार्वत्रिक निवडणूक करविण्याची मागणी करत आहेत.









