अध्यक्ष-उपाध्यक्ष नवीन; गावातील समस्या मात्र जुन्याच : गावातील विकासकामे राबविण्यात यशस्वी होणार का?
वार्ताहर /सांबरा
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका जवळजवळ पूर्ण झाल्या असून पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाली आहे. मात्र अध्यक्ष-उपाध्यक्ष हे जरी नवीन असले तरी प्रत्येक गावातील समस्या मात्र जुन्याच आहेत. त्यामुळे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष या समस्या सोडवतील काय, असा प्रश्न सध्या नागरिकांतून विचारला जात आहे. अनेक गावांमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुका अत्यंत चुरशीने झाल्याचे पहावयास मिळाले. सदर निवडणुकांमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. अनेक गावांमध्ये इर्ष्येने निवडणूक झाली. मात्र निवडीनंतर पुढील अडीच वर्षांमध्ये त्याच इर्ष्येने गावांमध्ये विकासकामेही होतील काय, असाही प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. सध्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरी समस्यांनी डोके वर काढलेले आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये तर अजूनही पाणी समस्या आहे. गटारी तुंबलेल्या आहेत तर काही गावांमध्ये कचरा समस्या गंभीर बनली आहे. कचऱ्याची उचल करण्यासाठी कचरागाड्यासुद्धा नाहीत. शासनाच्या इतक्या योजना असूनदेखील अजून बऱ्याच गावांमध्ये त्या योजना ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य याकडे लक्ष देतील काय, असाही प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे.
नागरिकांना योजनांची माहिती देणे गरजेचे
सध्या शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. मात्र अनेक सदर योजनांची योग्यवेळी माहिती मिळत नसल्याने अनेक नागरिक, शेतकरी या योजनांपासून वंचित आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी योजनांची नागरिकांना वेळेवर माहिती देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत सदस्य व पीडीओ यांच्यामध्ये सुसंवाद असेल तर गावचा नक्कीच विकास होऊ शकतो. मात्र काही ग्रामपंचायतीमधील पीडीओ हे नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ संगणक उतारे देण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे याकडेही ग्रामपंचायत सदस्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
विरोधात असलेले सदस्य देखील आता एकत्रच
राजकारणामध्ये कोण कोणाचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अलीकडे झालेल्या ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेहमी एकमेकांच्या विरोधात असलेले सदस्य देखील एक झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही आपली डोकी भडकवून न घेता शांत राहणे गरजेचे असल्याचे ओळखून आहेत.









