विजय पाटील, सरवडे
Election News : राज्यातील सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु राज्यात मान्सूनची सुरुवात होत असून ३० जून नंतर मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होते. त्यामुळे ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे अशा संस्थांचे निवडणूक कामकाज पूर्णपणे पावसाळ्यात होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होऊ शकते तसेच या सहकारी संस्था मधील सभासद शेतकरी खरीप हंगामामध्ये शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने ते मतदानापासून वंचित राहू शकतात. यामुळे राज्य सरकारने निवडणूकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता पावसाळ्यानंतरच घेण्याचा आदेश आज पारीत केला. राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत . या आदेशात पुढे म्हंटले आहे की, ज्या अर्थी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यातील निवडणुकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या ८२ हजार ६३१ ( २५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून ) पैकी ४९ हजार ३३३ सहकारी संस्थांच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या असून ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. अशा संस्थांपैकी ४२ हजार १५७ संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून ६ हजार ५१० सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत.
ज्या अर्थी राज्यात ३० जून नंतर पर्जन्यमानाचे स्वरूप जास्त असल्याने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता तसेच सदर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १५७ अन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकारात कलम ७३ क क मधील तरतुदीला सूट देऊन २५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणी सर्वोच्च व उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे अशा सहकारी संस्था तसेच ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे परंतु अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड होणे बाकी आहे अशा संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
बिद्री, भोगावती निवडणूकांचा कार्यक्रम पुढे ढकलला
जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून यासाठी अर्ज दाखल करून घेण्यात आले आहेत. गुरुवार दि. २९ रोजी या अर्जांची छाननी होणार होती. ती आजच्या आदेशामुळे रद्द करण्यात आली असून निवडणूक कार्यक्रम आहे त्या टप्प्यावर थांबविण्यात आला आहे. तर बिद्री साखर कारखान्याच्या निवडणूकीवरून सत्ताधारी व विरोधी गट न्यायालयीन लढाई लढत असून आजच्या आदेशाने बिद्रीचीही निवडणूक ३० सप्टेंबर नंतरच होईल यावर शिक्कामोर्तब झाले आहे.









