श्रीनगर
सध्या जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये निवडणूक मतदारयादी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर केंद्रशासित प्रदेशात योग्य वेळी निवडणुका होतील आणि त्यानंतर राज्याचा दर्जा बहाल केला जाईल, असे जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी रविवारी स्पष्ट केले. काँग्रेसचे ज्ये÷ नेते करण सिंह यांच्या मागणीनंतर त्यांनी ही टिप्पणी केली. करण सिंह यांनी विधानसभा निवडणुका घेण्याची आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी केली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकनानंतर मतदार यादीत दुरुस्ती सुरू झाली आहे. प्रथम सीमांकन, नंतर निवडणुका, नंतर योग्यवेळी राज्याचा दर्जा बहाल करणे, असे यापूर्वीही प्रशासनाकडून अनेकवेळा सांगण्यात आले असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले. या कार्यवाहीबाबत शंका घेण्यास जागा नसल्याचेही त्यांनी नमूद केले.









