प्रादेशिक आयुक्तांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर : इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव महानगरपालिकेच्या चार स्थायी समित्यांचा कार्यकाळ 1 जुलै रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे स्थायी समित्यांची निवडणूक घेण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी प्रादेशिक आयुक्तांकडे पत्र दिले होते. त्यानुसार प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णावर यांनी 2 जुलै रोजी निवडणूक तारीख घोषित केली आहे. त्याच दिवशी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासह निवड देखील जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
स्थायी समित्यांची निवडणूक प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडते. यावेळी चारही स्थायी समित्यांवर प्रत्येकी सात सदस्यांची निवड केली जाते. सत्ताधारी व विरोधी गटात सामंजस्य असेल तर ही निवडणूक बिनविरोध पार पडते. न झाल्यास यासाठी मतदान घेतले जाते. 2010 साली केवळ पहिल्यांदाच स्थायी समिती निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले होते. त्यावेळी सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनी विरोधी गटाला मतदान केल्याने दोन स्थायी समित्यांवर विरोधी गटाची सत्ता आली होती. ही चूक टाळण्यासाठी सत्ताधारी गटाकडून विरोधी गटाला सोबत घेण्याची पद्धत पुन्हा सुरू झाली आहे.
मागील सभागृहात प्रत्येक स्थायी समितीवर सातपैकी तीन जागांवर विरोधी गटाच्या नगरसेवकांना संधी दिली जात होती. विद्यमान सभागृहात विरोधी गटाच्या प्रत्येकी दोन नगरसेवकांना स्थायी समितीवर संधी देण्यात आली आहे. पहिली दोन वर्षे सत्ताधारी गटाने विरोधी गटालाही स्थायी समितीवर संधी दिली आहे. त्यामुळे मतदान घेण्याची वेळ आली नाही. यावेळीही सत्ताधारी व विरोधी गट एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
सध्याच्या चारीही स्थायी समितींचा कार्यकाळ 1 जुलै रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे निवडणूक घेण्यासंदर्भात मनपा आयुक्त शुभा बी. यांनी प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णावर यांना पत्र दिले होते. त्यानुसार आरोग्य, बांधकाम, अर्थ व लेखा या चार स्थायी समित्यांसाठी 2 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. दुपारी 3 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत अर्ज दाखल करणे व माघार घेणे प्रक्रिया असेल. 23 व्या स्थायी समितीसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे अध्यक्ष व सदस्य पदांसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.









