वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राज्यसभेच्या 8 जागांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली आहे. ती 19 जूनला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. 19 जूनला मतदान आणि मतगणनाही होणार आहे. काही राज्यसभा सदस्य लवकरच निवृत्त होणार आहेत. तसेच तामिळनाडूच्या सहा खासदारांचा राज्यसभेचा कालावधी 24 जुलैला संपत आहे. त्यामुळे निवडणूक घेतली जाणार आहे.
बीरेंद्रप्रसाद बैश्य आणि मिशन राजन दास या भारतीय जनता पक्षाच्या आसाम विधानसभेतून राज्यसभेवर गेलेल्या दोन खासदारांचा कालावधी संपत आहे. त्यामुळे त्यांची रिक्तपदे भरण्यासाठी ही निवडणूक होत आहे. तसेच अनबुमणी रामदास (पीएमके), एन. चंद्रशेगरन (अद्रमुक), एम. शण्मुगम (द्रमुक), पी. विल्सन (द्रमुक) आणि वायको (एमडीएमके) यांचा राज्यसभा कालावधीही 24 जुलै या दिवशी संपत आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱ्या पदांसाठीही निवडणूक होत आहे.
2 जूनला अधिसूचना
या आठ जागांसाठीच्या राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना येत्या 2 जूनला काढण्यात येणार आहे. त्यानंतर नामांकनपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेला आरंभ होईल. 19 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतगणना होणार आहे. या निवडणुकीनंतर राज्यसभेतील पक्षीय बलाबलावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण सध्या ज्या पक्षाच्या जितक्या जागा आहेत, त्याच या निवडणुकीत येणार आहेत, हे जवळपास निश्चित आहे, असे तज्ञांचे मत आहे.









