पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग : शेतकरी दमदार वळीव पावसाच्या प्रतीक्षेत : शेणखत वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल
वार्ताहर /किणये
गेल्या आठवड्याभरात काही ठिकाणी थोड्या प्रमाणात वळीव पाऊस झाला. यामुळे तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. मात्र शिवारात अजूनही दमदार वळीव पाऊस हवा आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या शेतशिवारात बैलजोडीच्या साह्याने नांगरण, ट्रॅक्टरने कल्टी, पॉवर टिल्लरने मशागत करणे अशी मशागतीची कामे सुरू आहेत. दि. 10 रोजी विधानसभा निवडणुका झाल्या व दि. 13 रोजी निकाल लागला. ग्रामीण भागातही निवडणुकीची रणधुमाळी बरीच रंगली होती. आपल्या पसंतीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यापासून ते प्रचार, मतदान व निकालापर्यंत तालुक्यातील बरेचसे शेतकरी बांधव व्यस्त होते. वीस ते पंचवीस दिवस या निवडणुकीच्या धावपळीत गेले. आपल्या उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आणण्यासाठी शेतकऱ्यांनी शिवारातील कामांकडे दुर्लक्ष केले होते. निवडणुका हा एकच ध्यास त्यांनी धरला होता.
निवडणुकीच्या निरर्थक चर्चा
दि. 13 रोजी निकाल लागला आणि समर्थक व कार्यकर्त्यांची धावपळ थांबली. निकालानंतर अधिक चर्चा रंगू लागल्या आहेत. उमेदवाराची निवड कशी करायला हवी होती. प्रचार कसा करावयाचा होता. याबद्दल बरीचशी चर्चा गेले तीन-चार दिवस रंगली. निवडणुका संपल्या आता बळीराजाला आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करावीच लागणार. आता निवडणुकीच्या विषयांबरोबरच शेतकरीवर्ग शिवारात राबताना दिसू लागले आहेत. खरीप हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. मात्र अजूनही दमदार वळीव पावसाची गरज असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यंदा वळीव पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे मशागतीची कामे खोळंबली. गेल्या आठवड्याभरापूर्वी काही ठिकाणी तुरळक प्रमाणात वळीव पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. दरवर्षी वीस मे पासून धूळवाफ पेरणी करण्यात येते. यंदा मात्र ही पेरणी लांबणीवर पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरणही निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शिवारातील मशागतीसह बरीच कामे करण्यात शेतकरी दिसत आहेत.
शेणखताचा वापर वाढला
तालुक्यातील बहुतांशी शेतकरी शेणखताचा वापर अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे पीक चांगले बहरून येते. तसेच रासायनिक खताचा वापर कमी होत असल्याने येणारे पीक हे आरोग्यासाठी लाभदायकच ठरते. यामुळे शेणखत पीक पाण्यासाठी तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. यामुळे शेणखताचा वापर करण्याकडेही काही शेतकऱ्यांनी जोर दिला आहे. मशागतीच्या आधीच शेतात शेणखत टाकण्यात आले आहे. तसेच बांध घालणे, शेतातील केरकचरा जमा करणे, खणणे आदी कामांना मजुरांची टंचाई भासत आहे. सध्या शिवारातील किरकोळ कामासाठी शेतमजुरांना दिवसाला 150 ते 200 रुपये याप्रमाणे मजुरी देण्यात येत आहे, या मजुरीत भागानुसार बदल होत आहे. शेतात कामकाज करीत असतानाही शेतकऱ्यांमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा विषय रंगताना दिसू लागला आहे. येणारा महिनाभर तरी निवडणुकीचा विषय रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेतीत ओलावा झाल्यास योग्य

गेले 25 दिवस आम्हा शेतकऱ्यांनाही निवडणुकीच्या प्रचारात भाग घ्यावा लागला होता. त्यामुळे शेतातील कामे खोळंबली. आता निवडणुका झाल्या, निकालही लागला. आम्हाला आपला दैनंदिन शेती हा व्यवसाय करावा लागत आहे. सध्या मशागतीची कामांना सुरुवात केली आहे. मात्र मोठा वळीव पाऊस झाल्यास शेतात अधिक ओलावा निर्माण होईल आणि मशागतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे.
– मारुती पाटील, शेतकरी








