सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात
खानापूर : खानापूर तालुका मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच निवडणूक कर्मचारी आपापल्या ठिकाणी मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट मशीन यासह इतर सामग्री घेऊन मतदार केंद्रावर रवाना झाले आहेत. तालुक्यात एकूण 255 मतदान केंद्रे आहेत. तर तालुक्यात एकूण 2 लाख 18 हजार 507 त्यामध्ये पुरुष 1 लाख 9 हजार 357 तर महिला 1 लाख 2 हजार 142 महिला तर 12 तृतीयपंथी असे मतदार आहेत. येथील सिद्धिविनायक हायस्कूलच्या मैदानात सर्व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे व साहित्य देवून मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले. सर्व मतदान केंद्रांवर कर्मचारी पोहचले असून आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांनी दिली. तालुक्यात एकूण 255 मतदान केंद्रे असून यात पाच सखी मतदान केंद्रे, एक पीडब्लुडी तर एक युवा मतदान केंद्र असणार आहे. तर 158 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. उर्वरित मतदान केंद्रांवर कॅमेऱ्यातून चित्रण करण्यात येणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून येथील सिद्धिविनायक हायस्कूल मैदानावरून मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट मशीन व इतर साहित्य घेऊन कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. एकूण 93 वाहनांतून या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोचविण्यात आली आहे. प्रत्येक वाहनात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एका मतदान केंद्रावर पीआरवो, एपीआरओ, दोन पीओ आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आल्या आहेत. तालुक्यात 32 अतसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जागरूकता करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे रात्री उशिरापर्यंत सिद्धिविनायक शाळेच्या मैदानावर एकत्रीकरण करण्यात येणार आहे. यानंतर सर्व मतदार यंत्रे सुरक्षित वाहनातून पोलीस बंदोबस्तात आरपीडी कॉलेज बेळगाव येथे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.









