आघाडीच्या उमेदवारांचा पराभव; आठ महिन्यात विकासाचा डोंगर उभा करु; भाजप नेत्यांची ग्वाही
सांगली प्रतिनिधी
महापालिकेच्या समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अनुक्रमे भाजपच्या अनिता वनखंडे व अस्मिता सलगर यांची निवड झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या कांचन कांबळे यांनी माघार घेतल्याने वनखंडे यांची बिनविरोध निवड झाली. तर सलगर यांनी आघाडीच्या आरती वळवडे यांचा 9 विरुद्ध 7 मतांनी पराभव केला. महापौर निवडणुकीत भाजपला दणका देणाऱया नसीम नाईक यांची घरवापसी झाली. त्यामुळे भाजपच्या सलगर यांचा विजय सुकर झाला. तर चिठ्ठीच्या चमत्काराची आशा बाळगणाऱया काँग्रेसचा मात्र अपेक्षाभंग झाला.
दरम्यान, निवडीनंतर वनखंडे, सलगर यांच्यासह भाजपच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला. मागील अडीच वर्षात विकासात खंड पडला. मात्र येणाऱया आठ महिन्यात महापालिका क्षेत्रात विकासकामांचा डोंगर उभा करू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून कुपवाड ड्रेनेज, 50 कोटींचा निधी, सुसज्ज नाटय़गृहासह अन्य कामांसाठी भरगोस निधी आणू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली. आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, शहरजिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, सभागृह नेत्या भारती दिगडे, स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांच्यासह भाजप नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमध्ये भाजप 9, काँग्रेस 4 तर राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. सभापती पदासाठी भाजपच्या अस्मिता सलगर व आघाडीच्या आरती वळवडे यांच्यामध्ये थेट लढत झाली. भाजपच्या 9 सदस्यांपैकी नसीमा नाईक यांनी गतवेळी आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले होते. यावेळी त्यांचे मतदान आघाडीलाच मिळेल अशी शक्यता होती. मात्र नाईक यु टर्न घेत पुन्हा भाजपच्या गोटात सहभागी झाल्या. भाजपच्या सलगर यांना 9 तर आघाडीच्या वळवडे यांना 7 मते मिळाली. सलगर यांना विजयी घोषित करण्यात आले.
तर महापालिकेच्या समाजकल्याण समितीमध्ये भाजप 7, राष्ट्रवादी 3 तर काँग्रेसच्या 1 सदस्यांचा समावेश आहे. सभापतीपदासाठी भाजपकडून अनिता वनखंडे व आघाडीच्या कांचन कांबळे यांनी अर्ज दाखल केले होते. दोन दिवसापासून राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाही राष्ट्रवादीचे एक सदस्य वारंवार आढेवेढे घेत होते. यामुळे काँग्रेसच्या गोटात अवस्थता निर्माण झाली. परिणामी कांबळे यांनी अर्ज मागे घेत भाजपच्या वनखंडे यांचा विजय सुकर केला. वनखंडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर वनखंडे व सलगर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.
विजयानंतर बोलताना भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार म्हणाले, दोन्ही सभापती त्यांच्या कामाने पदांना न्याय देतील. भाजप एकसंघ आहे हे या निवडणुकीतील विजयाने सिद्ध झाले. यापुढच्या काळात महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणू. मिरज येथील काळीखण सुशोभिकरण, कुपवाड ड्रेनेज, 50 कोटींचा निधी, सुसज्ज नाटय़गृहासह विविध विकासकामासाठी शासनाकडे पाठपुरावा करू. आठ महिन्यात महापालिका क्षेत्रात विकासकामांचा डोंगर उभा करू. याच विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही इनामदार यांनी सांगितले.
घनकचरा प्रकल्प निविदा विरोधावर ठाम
घनकचरा प्रकल्पाच्या निविदेमध्ये अनेक त्रुटी असल्याने भाजपने विरोध केला होता. यावर आजही ठाम आहोत. त्रुटी दूर झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत या निविदेवर पुढील कार्यवाही होणार नाही. पालकमंत्री सुरेश खाडे यांनाही याची माहिती दिली आहे. स्थायी समिती सभापतींनाही निविदा कायम का करू नये याबाबत कारणे देण्याचे पत्र आले आहे. आमच्याकडे कारणे आहेत. त्यामुळे घनकचरा प्रकल्पाची निविदा रद्द होईल, असेही इनामदार यांनी सांगितले.