अध्यक्षपदी राजेंद्र भातकांडे तर उपाध्यक्षपदी संतोष होर्तीकर यांची निवड
बेळगाव : दि बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनची सर्वसाधारण वार्षिक सभा मंगळवार दि. 20 जून रोजी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडली. या सभेवेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी राजेंद्र भातकांडे यांची निवड करण्यात आली. प्रेस ओनर्स असोसिएशनचे सल्लागार किरण ठाकुर व मधुकर सामंत यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देण्यात आल्या. प्रारंभी असोसिएशनचे दिवंगत सदस्य व बालासोर येथील रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मागील वर्षाचा जमाखर्च मांडण्यात आला. जमाखर्चाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच नूतन कार्यकारिणीसाठी काम करू इच्छिणाऱ्यांची नावे नोंदवून घेण्यात आली. सर्व सदस्यांच्या संमतीने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी राजेंद्र भातकांडे, उपाध्यक्ष संतोष होर्तीकर, सेक्रेटरी रघुनाथ राणे, उपसेक्रेटरी विलास सावगावकर, संचालकपदी श्रीधर जाधव, अशोक धोंड, सतीश जाधव, नंदकुमार देशपांडे, शाम मांगले, अजित कोळेकर, महिंद्र सावगावकर यांची पुढील दोन वर्षांकरिता निवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना किरण ठाकुर म्हणाले, प्रिंटिंग क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. जोवर स्वस्त दरामध्ये कागद उपलब्ध आहे, तोवर प्रिंटिंग क्षेत्राला कोणतीही भीती नाही. असे असले तरी व्यवसायामध्ये बदल करणे गरजेचे आहे. आज सर्वत्र डिजिटल प्रिंटींगची मागणी आहे. त्यामुळे प्रेस ओनर्समधील सदस्यांनी आपल्या व्यवसायामध्ये, तंत्रज्ञानामध्ये नवीन बदल करावेत.









