धीरज बरगे,कोल्हापूर
Kolhapur Gokul News : राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळमध्ये सध्या अध्यक्ष बदल करणे धोक्याचं ठरु शकते.सद्यस्थितीत अध्यक्ष बदलाच्या हालचाली झाल्यास जिल्ह्याच्या राजकारणाचे शक्तीस्थान असणारे गोकुळ भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून पुन्हा काबीज करण्याचा प्रयत्न महाडिकांकडुन होवू शकतो.अध्यक्ष बदला दरम्यान राज्यपातळीवरुन दबाव आल्यास गोकुळच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते सध्यातरी अध्यक्ष बदलाची रिस्क घेताना दिसत नाहीत. एकंदरीत हे राजकीय धोके ओळखून विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
गोकुळमध्ये तब्बल तीस वर्षांनी आमदार सतेज पाटील,आमदार हसन मुश्रीफ यांनी सत्तांतर घडवले.सत्तांतरानंतर अध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान अध्यक्षपदी प्रथम ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांना संधी देण्यात आली.हि संधी देताना सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ,आमदार सतेज पाटील यांनी पाठवलेल्या लखोट्यामधील पत्रामध्ये अध्यक्ष विश्वास पाटील 10 मे 2023 रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा देतील असे म्हटले होते.त्यानुसार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षपदाची मुदत आज संपणार आहे.मात्र सध्यातरी गोकुळमध्ये अध्यक्ष बदलाच्या कोणत्याही हालचाली सुरु नसल्याचे चित्र आहे.
अध्यक्ष बदल ठरु शकते धोक्याचं
राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमुळे राजकीय परिस्थिती बदललेली आहे. गोकुळमध्ये सत्ताधारी आघाडीसोबत असलेले आमदार विनय कोरे हे भाजपच्या जवळ असून ते भाजप-शिवसेनेतील घटक पक्ष आहेत. तर खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. आमदार कोरे, आबिटकर, माजी आमदार नरके यांचे गोकुळमध्ये प्रत्येकी दोन संचालक आहेत. त्यामुळे अध्यक्ष बदला दरम्यान राज्यपातळीवरुन दबाव आल्यास गोकुळमधील अध्यक्ष बदल सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याचे ठरणारे आहे.
‘राजाराम’प्रमाणे राजकारणाची शक्यता
नुकत्याच झालेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी माजी आमदार अमल महाडिक यांना साथ दिली.तर आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी महाडिकांना उघडपणे मदत केली नसली तरी करवीर तालुक्यातून महाडिकांच्या आघाडीला झालेले मतदान पाहता त्यांनी अप्रत्यक्षरित्या महाडिकांनाच मदत केल्याचे दिसून येत आहे.गोकुळमध्येही आमदार कोरे, पाटील, माजी आमदार नरके यांची भुमिका महत्त्वाची ठरणारी आहे.अशाच पद्धतीचे राजकारण गोकुळच्या अध्यक्ष बदला दरम्यान झाले तर सत्ताधाऱ्यांची गोची होवू शकते.त्यामुळे छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीतून नुकताच मिळालेला अनुभव पाहता गोकुळमध्ये अध्यक्ष बदलाची रिस्क सत्ताधारी घेतील असे वाटत नाही.
अध्यक्ष पाटील यांचे प्रभावी काम
गेल्या दोन वर्षांत अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अध्यक्ष पदाची धुरा प्रभावीपणे सांभाळली आहे.त्यांच्या कार्यकाळात दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैस दूधास 10 रुपये तर गाय दूधास 11 रुपयांची दरवाढ मिळाली आहे.शेतकरी हिताच्या अनेक योजना त्यांनी राबविल्या आहेत.त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांत संचालक मंडळात मतभेद दिसून आलेले नाहीत.त्यामुळे सर्व संचालकांना सोबत घेवून जाणारे नेतृत्त्व अशीही त्यांची ओळख निर्माण झाली आहे. तसेच अध्यक्ष पाटील संचालिका शौमिका महाडिक यांच्या प्रश्नांनाही प्रत्युत्तर देणारे एक अनुभवी व्यक्तीमत्त्व आहे.त्यांचा हा प्रभावी कार्यकाळ आणि सत्ताधाऱ्यां समोरील राजकीय संकटे पाहता अध्यक्षपदी विश्वास पाटील कायम राहू शकतात.
Previous ArticleKolhapur : शहरात आज पाणी पुरवठा बंद
Next Article ‘आरटीई’साठी 15 मेपर्यंत मुदतवाढ








