बेळगाव : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक चुरशीने पार पडली. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जारकीहोळी व जोल्ले गटाने बहुमत मिळविले आहे. बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड सोमवार दि. 10 रोजी होणार आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक असले तरी अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. निपाणी व चिकोडी तालुक्याचेही या निवडीकडे विशेष लक्ष लागले आहे. सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तांच्या आदेशानुसार सोमवार दि. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
दुपारी 3 वाजता अर्जांची छाननी करण्यात येणार असून, अर्जांच्या पडताळणीनंतर उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. यादी प्रसिद्ध केल्यानंतर 30 मिनिटांच्या आत उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा लागणार आहे. अर्ज माघारीनंतर मतदान होणार आहे. काही वेळानंतर लागलीच मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अण्णासाहेब जोल्ले यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. त्याचबरोबर निवडणुकीदरम्यान आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी अध्यक्षपदासाठी लिंगायत समाजाला प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे अध्यक्षपदासाठी अनेक मातब्बर नेतेही इच्छुक असल्याचे समजते. मात्र, पालकमंत्री सतीश जारकीहोळी व आमदार भालचंद्र जारकीहोळी हे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.









