ओटवणे / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण धोरण समितीच्या सदस्यपदी भरत सडक गावडे यांची निवड करण्यात आली आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात प्रभावी अमलबजावणीसाठी व अभ्यासक्रम निश्चितीसाठी महाराष्ट्र शासनाने समितीची स्थापना केली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे या समितीचे अध्यक्ष असुन शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सहअध्यक्ष तर शिक्षण आयुक्त उपाध्यक्ष आहेत.
ही समिती राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे अवलोकन करुन आवश्यक बदलांसह राज्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा समावेश, शिफारस, मार्गदर्शन तसेच शैक्षणिक कार्याचे स्नियंत्रन व सुसूत्रीकरण करण्यासाठी कार्यरत राहणार आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबावणीसह शासनाच्या विविध संस्थांमध्ये सुयोग्य, समन्वयाने समित्या व उपसमित्या तयार करुन त्यातील सदस्यांना मार्गदर्शन व शिफारसी करण्याचे कामही ही समिती करणार आहे.
भरत गावडे यांनी ३३ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन करीत असताना अभिनव शैक्षणिक उपक्रम राबवले. मराठी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून गेली २० वर्षे ते राज्य, विभाग व जिल्हा स्तरावर कार्यरत आहेत. तसेच निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी या दोन्ही प्रशिक्षणासाठी त्यांनी कोकण विभाग व जिल्हा स्तरावर साधन व्यक्ती म्हणून काम केले. एक उपक्रमशील शिक्षक आणि मराठी विषयाचे तळमळीचे शिक्षक म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सेवानिवृत्तीनंतरही ते शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी आहेत. दाणोली येथील साटम महाराज वाचनालयाचे ते अध्यक्ष असून कोमसापचे ते जिल्हा कोषाध्यक्ष आहेत. आरती मासिकाचेही ते सहसंपादक आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे ते कार्याध्यक्ष असून कोकण ग्रंथालय संघाचे सदस्यही आहेत.
त्यांच्या या शैक्षणिक, साहित्य, ग्रंथालय क्षेत्रातील कार्याची दाखल घेऊन महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने त्यांची राज्यस्तरीय समितीवर निवड केली आहे.या निवडीबद्दल भरत गावडे यांचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि ना लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.









