प्रतिनिधी,कोल्हापूर
भाजपच्या जिल्हा प्रवक्तेपदी अशोक देसाई यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा भाजपच्या पूर्व, पश्चिम आणि कोल्हापूर महानगर अशा तिन्ही जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये महानगर कार्यकारिणीवर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेल्या अशोक देसाई यांच्यावर पक्षाच्या जिल्हा प्रवक्तेपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली.
देसाई यांची प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय जगतात ओळख आहे. त्याचबरोबर त्यांनी हिंदू युवा प्रतिष्ठानची स्थापना करून संस्थापक अध्यक्ष म्हणून हिंदुत्ववादी विचाराचे कार्य सुरू ठेवले आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि संघटन सरचिटणीस म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्याचबरोबर भाजपने आजवर केलेल्या जनादोंलनात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.
विविध उपक्रमही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आहे. त्यांचे योगदान आणि अनुभव पाहून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांना जिल्हा प्रवक्तेपदी निवडण्यात आले आहे. त्यांना या निवडीसाठी खासदार धनंजय महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी अध्यक्ष राहुल चिकोडे यांचे सहकार्य लाभले. देसाई यांना निवडीचे पत्र नुकत्याच झालेल्या बैठकीत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.









